सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे
कोलारी येथील प्रकार, तांत्रिक अधिकाऱ्याचे संगनमत
लाखनी :- (कालिदास खोब्रागडे) ग्रामीण परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून अनेक योजनांचे माध्यमातून आवश्यक तो निधीही उपलब्ध करतो. पण क्रियान्वयन यंत्रणेतील लोक सेवकांमुळे उद्देशपूर्ती होत नाही. याचा प्रत्यय कोलारी/पट येथे आला. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रिट नाली बांधकामात साहित्याचा अल्प प्रमाणात वापर करण्यात आल्याने नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे वास्तव समोर आल्याने गटविकास अधिकारी पंचायत समिती लाखनी यांनी चौकशी करून सत्यता जनतेसमोर आणणे आवश्यक झाले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्या प्रीत्यर्थ आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करून शासनाने पाठ थोपटून घेतली असली तरी ग्रामीण परिसरात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याची सत्यता नाकारता येत नाही. कोलारी/पट येथे पावसाचे पाणी व सांडपाण्याची पर्याप्त व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचून जाणाऱ्या येणाऱ्यांना अकारण त्रास सहन करावा लागत असे. तसेच साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होऊन साथीच्या रोगांची शक्यता नाकारता येत नव्हती. गावकऱ्यांचे सोयीचा विचार करून ग्रामपंचायतीच्या मागणी वरून आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रमोद गाढवे ते केवळ हेमने यांचे घरापर्यंत ११ लक्ष रुपये अंदाजपत्रकीय रकमेचे सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले. करारनामा ग्रामपंचायतीचे नावे असून यावर तांत्रिक मार्गदर्शन, देखरेख व सनियंत्रणाचे काम पंचायत समिती लाखनी चे तांत्रिक अधिकारी(कृषी) सुधाकर कांबळे यांचेकडे सोपविण्यात आले होते. करारनामा ग्रामपंचायतीचे नावे असला तरी टक्केवारीने हे सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम ग्रामपंचायतीच्या एका पदाधिकाऱ्यास देण्यात आले आहे. त्याने तांत्रिक अधिकाऱ्याशी संगनमत करून सिमेंट काँक्रिट नाली बांधकामात साहित्याचा अल्प प्रमाणात वापर तसेच बांधकाम झालेल्या ठिकाणी पाण्याचा वापर केला गेला नसल्यामुळे नाली बांधकाम निकृष्ट प्रतीचे होत आहे. गट विकास अधिकारी पंचायत समिती लाखनी यांनी या सिमेंट काँक्रिट नाली बांधकामाची चौकशी करून सत्यता जनतेसमोर आणणे आवश्यक झाले आहे.

