‘महात्मा गांधी अभ्यासाचा नव्हे, जीवन जगण्याचा विषय’–डॉ. संदीप तुंडुरंवार

गांधी विचारांत व्यक्ती, कुटुंब, समाज, राज्य आणि विश्वकल्याणाचा व्यापक दृष्टिकोन – डॉ. शैलेंद्र लेंडे

E-Paper महाराष्ट्र सामाजिक
Share
महात्मा गांधी हे अभ्यासाचा नव्हे, जीवन जगण्याचा विषय असल्याचे प्रतिपादन श्री बिंझाणी नगर महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप तुंडुरंवार यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि मराठी विभागांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘गांधी विचार : लोकशाही, श्रम, समाजवाद, स्वराज्य’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा राज्यशास्त्र विभागात आयोजित केली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संदीप तुंडुरंवार मार्गदर्शन करीत होते.
माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. जितेंद्र वासनिक होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास जांभुळकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. ‘गांधी, सत्ता आणि लोकशाही’ या विषयावर मार्गदर्शन करताना महात्मा गांधी याचे राजकीय आणि सामाजिक तत्त्वज्ञान केवळ सैद्धांतिक चिंतनापुरते मर्यादित नसून मानवी जीवनाला नैतिक अधिष्ठान देणारे असल्याचे डॉ. संदीप तुंडूरवार यांनी पुढे बोलताना सांगितले. सत्य, अहिंसा, लोकसहभाग, सामाजिक समता आणि नैतिक जबाबदारी या मूल्यांचा स्वीकार केल्याशिवाय गांधी विचारांची खरी सार्थकता सिद्ध होऊ शकत नाही. महात्मा गांधीजींच्या दृष्टीने सत्ता ही वर्चस्व प्रस्थापित करण्याचे साधन नसून लोकसेवा, समाजकल्याण आणि मानवी विकासाचे माध्यम आहे. लोकशाही ही केवळ निवडणुका, राजकीय पक्ष आणि शासन संस्थांपुरती मर्यादित नसून ती नागरिकांची नैतिकता, सामाजिक जबाबदारी आणि सक्रिय लोकसहभाग यांवर आधारित असली पाहिजे, असे डॉ. तुंडूरवार यांनी सांगितले.
महात्मा गांधी यांनी सत्तेच्या केंद्रीकरणाला विरोध करून ग्रामस्वराज्य आणि विकेंद्रित लोकशाहीचा पुरस्कार केला. राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक समता, आर्थिक स्वावलंबन आणि व्यक्तीच्या नैतिक विकासाला त्यांनी महत्त्व दिले. लोकशाहीच्या यशासाठी नागरिकांनी केवळ अधिकारांची मागणी न करता कर्तव्य आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक संबंधांचाही त्यांनी ऊहापोह केला. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात जातिव्यवस्था, सामाजिक न्याय आणि राजकीय प्रतिनिधित्व यांसारख्या प्रश्नांवर वैचारिक मतभेद होते. तथापि, महात्मा गांधी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेची, कायदेविषयक ज्ञानाची आणि बौद्धिक क्षमतेची जाणीव होती. संविधाननिर्मितीच्या प्रक्रियेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहभाग असावा, यासाठी महात्मा गांधी यांनी अनुकूल भूमिका घेतल्याचा ऐतिहासिक संदर्भ त्यांनी मांडला. वैचारिक मतभेद असतानाही दुसऱ्याच्या विद्वत्तेचा आणि कर्तृत्वाचा आदर करणे हे लोकशाही संस्कृतीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा गांधी यांच्या विचारांची उपयुक्तता केवळ राजकीय चर्चांपुरती मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनात सत्य, अहिंसा, सहिष्णुता आणि मानवी संवेदनशीलता या मूल्यांचा स्वीकार करण्यामध्ये आहे. गांधी विचारांचे अध्ययन करण्याबरोबरच त्यांचे आचरण होणे आवश्यक असल्याचे डॉ. तुंडुरंवार यांनी सांगितले.
कार्यशाळेच्या प्रारंभी डॉ. सचिन चापके यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. महात्मा गांधी विचारांचे महत्त्व भारतीय स्वातंत्र्यलढ्यापुरते मर्यादित नसून वर्तमानातील लोकशाही व्यवस्था, सामाजिक विषमता, आर्थिक असमानता, श्रमप्रतिष्ठा आणि नैतिक मूल्यांच्या संदर्भातही ते मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. गांधी विचारांच्या विविध पैलूंचा अभ्यास करून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक आणि मूल्याधिष्ठित दृष्टिकोन विकसित व्हावा, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर भाषाशास्त्र, भारतीय व परदेशी भाषा विभागाशी संबंधित तथा मानव्यविद्या अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. शिलादित्य बिकाश श्रीचंदन सिंग यांनी ‘गांधी, श्रम आणि समाजवाद’ या विषयावर सविस्तर विचार व्यक्त केले. महात्मा गांधी यांची समाजवादाची संकल्पना ही केवळ आर्थिक संपत्तीचे वितरण किंवा आर्थिक व्यवस्थेतील परिवर्तनापुरती मर्यादित नसून मानवी प्रतिष्ठा, श्रमाचे मूल्य, सामाजिक समता, स्वावलंबन आणि नैतिक जबाबदारी यांवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळावी आणि आर्थिक विषमतेतून निर्माण होणारे सामाजिक भेद कमी व्हावेत, हा गांधीवादी समाजवादाचा महत्त्वपूर्ण उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा गांधी यांनी श्रमाला मानवी जीवनाचे अविभाज्य अंग मानले होते. शारीरिक आणि बौद्धिक श्रम यांमध्ये उच्च-नीचतेचा भेद न करता प्रत्येक व्यक्तीच्या श्रमाला समान सन्मान मिळाला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. श्रम हे केवळ उपजीविकेचे साधन नसून व्यक्तीच्या आत्मसन्मानाचे, स्वावलंबनाचे आणि सामाजिक योगदानाचे माध्यम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गांधीवादी समाजवादामध्ये अहिंसा, विश्वस्तत्व, आर्थिक विकेंद्रीकरण, ग्रामोद्योग, स्वदेशी, स्वावलंबन आणि सर्वोदय या संकल्पनांना विशेष महत्त्व आहे. संपत्तीचे अत्यधिक केंद्रीकरण टाळून उपलब्ध संसाधनांचा उपयोग व्यापक समाजहितासाठी व्हावा, अशी गांधीजींची भूमिका होती. आर्थिक विकासाचा लाभ समाजातील मर्यादित घटकांपुरता न राहता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
आधुनिक आर्थिक व्यवस्थेत संपत्तीचे केंद्रीकरण, वाढती आर्थिक विषमता, बेरोजगारी आणि श्रमाचे अवमूल्यन या समस्या प्रकर्षाने जाणवत असताना गांधीवादी समाजवादाचा नव्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील शेवटच्या घटकाच्या उन्नतीशिवाय सर्वसमावेशक आणि समताधिष्ठित विकास साध्य होऊ शकत नाही. त्यामुळे गांधीजींचे श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन आणि सर्वोदयाचे विचार आजच्या सामाजिक व आर्थिक व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रा. सिंग यांनी सांगितले.
*गांधींचे व्यक्तिमत्त्व विश्वकल्याणापर्यंत व्यापक – डॉ. शैलेंद्र लेंडे*
कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात ‘गांधी आणि स्वराज्याची संकल्पना’ या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि नैतिक पैलू उलगडले. गांधीजींचे व्यक्तिमत्त्व एकाच वेळी व्यक्ती, कुटुंब, समाज, राज्य आणि विश्व या पाचही घटकांशी संबंधित होते. व्यक्तीच्या पातळीवर आत्मशुद्धी, सत्य, अहिंसा आणि आत्मसंयम; कुटुंबाच्या पातळीवर नैतिक संस्कार, परस्पर जबाबदारी आणि सहजीवन; समाजाच्या पातळीवर समता, बंधुता, सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मसमभाव; राज्याच्या पातळीवर लोकशाही, विकेंद्रीकरण, लोकसहभाग आणि स्वराज्य; तर विश्वाच्या पातळीवर शांतता, मानवता, सहअस्तित्व आणि विश्वबंधुत्व या मूल्यांचा गांधीजींच्या विचारांमध्ये समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. गांधीजींच्या दृष्टीने स्वराज्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मिळालेले राजकीय स्वातंत्र्य नव्हते. व्यक्तीचे आत्मशासन, समाजातील नैतिक मूल्यांची जोपासना, आर्थिक स्वावलंबन आणि लोकांनी स्वतःच्या विकासाची जबाबदारी स्वीकारणे हा स्वराज्याचा व्यापक अर्थ होता. गांधीजींच्या स्वराज्यविषयक चिंतनात राजकीय स्वातंत्र्याबरोबरच व्यक्तीच्या अंतर्गत परिवर्तनालाही विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले. गांधीजींच्या विचारांमध्ये व्यक्तीचे कल्याण आणि समाजाचे कल्याण यांचा परस्परसंबंध आढळतो. व्यक्तीच्या नैतिक विकासातून कुटुंब, समाज आणि राज्यव्यवस्थेचे परिवर्तन घडू शकते आणि त्यातून विश्वकल्याणाचा मार्ग निर्माण होऊ शकतो, असा व्यापक दृष्टिकोन गांधीजींच्या तत्त्वज्ञानात असल्याचे डॉ. लेंडे यांनी सांगितले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी असलेले डॉ. जितेंद्र वासनिक यांनी संक्षिप्त अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी गांधी विचारांच्या समकालीन महत्त्वाचा उल्लेख केला. या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास जांभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन चापके यांनी केले. भूपेंद्र घरत यांनी सूत्रसंचालन केले, तर सिमरन बजाज यांनी उपस्थित मान्यवर, प्रमुख वक्ते, प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. किशोर नैताम, प्रा. किशोर पाटील, प्रा. प्रमोद काणेकर, प्रा. अमृता इंदूरकर आणि प्रा. समीर यांच्यासह राज्यशास्त्र, समाजशास्त्र व मराठी विभागांतील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यशाळेला विद्यापीठातील विविध विभागांचे शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते. तीन विभागांच्या संयुक्त आयोजनातून गांधी विचारांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि नैतिक पैलूंचे बहुआयामी आकलन घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. गांधी विचारांचे केवळ सैद्धांतिक अध्ययन न करता त्यांचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध जोडण्याचा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत