वाहनांची कागदपत्रे डीजी लॉकरमधील ग्राह्य धरणार .
पोलिस सहआयुक्तांचा कार्यालयीन आदेश.
वाहनांची कागदपत्रे डीजी लॉकरमधील दाखवूनही काही वाहतूक पोलिस व अधिकारी वाहनचालकांवर ई-चलन दंडात्मक कारवाई करतात. अशा तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे अखेर पोलिस सहआयुक्तांनी वाहनांची डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत, असे कार्यालयीन आदेशच काढले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
वाहनांमध्ये पूर्वी वाहन नोंदणी प्रमाणपत्रासह (आरसी बुक) विमा पॉलिसी, पीयूसी यांची मूळ प्रत ठेवणे बंधनकारक होते. परंतु, केंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या निर्देशानुसार वाहनचालक अनुज्ञप्ती आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र तसेच अन्य कागदपत्रांची डिजिटल कॉपी डीजी लॉकरवर ठेवू शकतात. परंतु, वाहतूक विभागातील काही पोलिस शिपाई व अधिकारी डीजी लॉकरमधील कागदपत्रे दाखवूनही ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाई करत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांत वाढल्या होत्या. याची गंभीर दखल वाहतूक विभागाचे पोलिस सहआयुक्त अनिल कुंभारे यांनी घेतली.
वाहतूक नियंत्रण शाखेंतर्गत असलेले सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कर्तव्यावरील पोलिस अधिकारी यांनी वाहनमालक व चालक यांच्याकडे वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहनाचा विमा, पीयूसी यांची मागणी केल्यानंतर वाहनचालकाने त्यांचे डीजी लॉकरमधील वाहनांचे कागदपत्र दाखवल्यास ती कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत, या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देशही सहआयुक्तांनी दिले आहेत.

