(जिल्हा प्रतिनिधि पंचशिल वाळके)
नागपूर :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा विभागात आजी-माजी विद्यार्थी मेळावा शनिवार दि. २० डिसेंबर २०२५ रोजी विभागातील प्रार्थना सभागृहात करण्यात आला. या मेळाव्यात ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची गरज’ या विषयावरती मुक्त चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी भूषविले, प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. राजू हिवसे, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार, मानव विज्ञान विद्या शाखेचे माजी अधिष्ठाता व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय वाटमोडे, डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे यांची उपस्थिती होती.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यावर संशोधन व्हावे ही इच्छा यावेळी माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी व्यक्त केली. माजी विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय वाटमोडे यांनी राष्ट्रसंतांचे साहित्य हे अक्षर वा:डमय असून त्याचा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे, असे मौलिक विचार व्यक्त केले. डॉ. गुरुप्रसाद वाटमोडे यांनी संत साहित्याचा अभ्यास ही काळाची गरज असून तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार होण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचे आवाहन आजी-माजी विद्यार्थ्यांना केले. वर्तमान स्थितीत समाजातील तरुण भरकटलेला आहे व राष्ट्रसंतांचे विचारच त्यांना योग्य दिशा दर्शवू शकतात असे, मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा विभाग प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे यांनी व्यक्त केले.
मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात आजी-माजी विद्यार्थ्यांना वर्तमान स्थितीत :राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची गरज’ या विषयावरती मुक्त चर्चा करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार प्रस्तुत कार्यक्रम पार पडला व यावेळी आजी-माजी विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रभावीपणे व्यक्त केलेत. कार्यक्रमाचे संचालन प्रा. वर्षा पाटील व आभार डॉ. देवमन कामडी यांनी मानले. यावेळी विभागातील डॉ. जयेंद्र मेश्राम, प्रा. राहुल उईके, प्रा. दिव्या राजुरकर, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद व कल्याणी मेश्राम यांनी परिश्रम घेतले. विभागातील आजी-माजी विद्यार्थी यांचीही यावेळी सहभाग होता.


