अंगणवाडी भरतीत ‘वशिला’ एक्सप्रेस जोरात; गुणवंत आणि गरजू महिलांना डावलल्याचा आरोप.
TIMES OF ORANGE CITY विशेष बातमी:
“स्थानिक महिलांना प्राधान्य” आणि “पारदर्शक प्रक्रिया” असे दावे प्रशासनाकडून केले जात असले तरी, प्रत्यक्षात मात्र वशिला आणि घराणेशाहीचा उच्छाद मांडला जात असल्याची संतप्त भावना सामान्य महिलांमधून व्यक्त होत आहे.
पात्रता बाजूला, वशिलाचीच चलती?
अनेक गावांमध्ये ज्या महिलांना सर्वाधिक गुण आहेत किंवा ज्या खरोखर गरजू (विधवा, परित्याक्त्या) आहेत, त्यांना डावलून राजकीय लागेबांधे असलेल्या महिलांची वर्णी लावली जात असल्याचे चित्र दिसत आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून खालील घटकांच्या नातेवाईकांनाच झुकते माप दिले जात असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे:
सरपंच आणि स्थानिक पुढाऱ्यांचे कुटुंबीय.
माजी अंगणवाडी सेविकांचे नातेवाईक.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील पदाधिकाऱ्यांचे जवळचे नातेवाईक.
‘स्थानिक’ निकषाचा केवळ फार्स?
नियमानुसार, त्याच गावातील महिलेला प्राधान्य मिळणे अपेक्षित आहे. परंतु, सोयीनुसार नियमांची मोडतोड करून वशिला असलेल्या उमेदवारांसाठी रस्ते मोकळे केले जात आहेत. यामुळे उच्चशिक्षित आणि पात्र असूनही सामान्य घरातील महिलांना संधी मिळत नाहीये.
“आम्ही रात्रंदिवस अभ्यास करून गुण मिळवले, पण निवडीच्या वेळी मात्र कोणाचे तरी नातेवाईक म्हणून त्यांना आधी घेतले जाते. मग या भरती प्रक्रियेचा उपयोग काय?” असा संतप्त सवाल एका गरजू महिला उमेदवाराने नाव न छापण्याच्या अटीवर विचारला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन, झालेल्या निवडीची सखोल चौकशी करावी आणि खऱ्या पात्र उमेदवारांना न्याय द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

