राजकारणापलिकडची मैत्री जपणारे बाळासाहेब ठाकरे

NAGPUR
Share

राजकारणापलिकडची मैत्री जपणारे बाळासाहेब ठाकरे

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे मित्रत्व जपणारे महाराष्ट्राचे नेते होते. बाळासाहेबांचे विरोधक विदर्भवादी विदर्भ वीर जांबुवतराव धोटे, टी. जी. देशमुख, प्रसिध्द कवी स्व. सुरेश भट, विदर्भवादी स्व. नाशिकराव तिरपुडे नेहमी सांगायचे. बाळासाहेब अखंड महाराष्ट्राचे पुरस्कर्ते होते तर आम्ही स्वतंत्र्य विदर्भाची मागणी करणारे होतो. पण असे असतानाही त्यांनी आपल्या मैत्रीत कधी राजकारण आणले नाही. सतत विदर्भाचा विकास व्हावा, अनुशेष भरून काढण्यावर त्यांचा भर होता. आमचे मतभेद असले तरी त्यांनी आपल्या मैत्रित मनभेद होऊ दिले नाही. आज पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शताब्दी वर्ष सुरु होत आहे. साहेबांना विनम्र अभिवादन
महाराष्ट्राचे प्रख्यात कवी स्व. सुरेश भट सांगायचे मी त्यांच्यावर अनेकदा टिका केली. पण, मैत्रित कधी खंड पडू दिला नाही. माझी सतत विचारपूस करीत होते, अनेक वेळा मला त्यांनी मदत केली. एवढेच नाही तर एका नागपूर दौऱ्यात माझ्या घरी भेटायला आले. त्यांनी शेवटपर्यत मैत्री जपली.
१९९५ मध्ये राज्यात सत्तातरण झाले. शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. तेव्हा त्यांनी विदर्भाच्या विकासाची कास धरली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक, माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्याशी शिवसेना प्रमुखांचा दोस्ताना होता. दोघेही काँग्रेसचे नेते असले तरी बाळासाहेबांनी आपली मैत्री कायम ठेवली.
विदर्भावर शिवसेना प्रमुखाचे विशेष प्रेम होते. ते विदर्भाच्या दौऱ्यावर आले की मित्रांची विचारपूस करायचे. बाळासाहेबाचे आजोळ अमरावती जिल्ह्यातील अचलपूर होते, याचा उल्लेख ते आपल्या भाषणात करायचे. १९९० मध्ये बाळासाहेबांची पहिली जाहीर सभा विदर्भातील अमरावतीच्या सायंन्स स्कोअर शाळेच्या मैदानात झाली होती. १९९५ मध्ये शिवसेना-भाजपची युती होती, यावेळी साहेबांनी राज्यात युतीची सत्ता आणण्यासाठी संपूर्ण विदर्भात २१ जाहीर सभा घेवून विदर्भ पिंजून काढला होता. त्यानंतर विदर्भातील कानाकोपऱ्यात शिवसेनेचा भगवा झेंडा पोचला, खेड्यापाड्यात शिवसेनेच्या शाखा दिसायला लागल्या. विधानसभा निवडणूकीत ११ आमदार निवडून आणले. आणि राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार आले, त्यांनंतर त्यांनी विदर्भाला झुकते माप देत विदर्भाच्या विकासा संबंधी सूचना त्यांनी मंत्र्याना केल्या होत्या. ते सतत आढावा घ्यायचे. विदर्भात शिवसेनेचे चार खासदार व अकरा आमदार निवडून आले होते.
विदर्भाच्या विकासाची जबाबदारी युतीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपविली होती. मेळघाटमध्ये बाळासाहेबांच्या प्रयत्नांमुळे डांबरी रस्ते पोचले. १९९६ मध्ये शिवसेना प्रमुखांची रामटेकमध्ये जाहीर सभा झाली, त्यात त्यांनी विदर्भाच्या विकासाची भगवी पत्रिका जाहीर केली होती.
विदर्भवाद्यांना चोपले
या सभेला विदर्भवादी काँग्रेस नेते दत्ता मेघे यांनी शिवसेना प्रमुखांना विदर्भ मागणीसाठी विरोध केला होता, पण शिवसैनिकांनी आपल्या पद्धतीने विदर्भ वाद्यांचा बंदोबस्त करून शिवसेना प्रमुखांची जाहीर सभा यशस्वी केली.
नागपूरला पहिली भेट
३ जानेवारी १९६९ मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या १२ सहकाऱ्यांसह भेट दिली होती. निमित होते. नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक संमेलनाचे. संयोजक दिलीप देवधर यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते.
सरसंघचालकांशी भेट
रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर यांच्याशी देवधर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची संघ मुख्यालयात भेट घडवून आणली होती. यावेळी दोन हिंदु संघटनेच्या प्रमुखांची भेट झाली होती. दोन तास दोघांमध्ये चर्चा झाली होती हे विशेष.
कम्युनिस्टाचा गाल रंगवला
नागपूर विद्यापीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांना निमंत्रित केल्यामुळे नागपूरच्या काही कम्युनिस्ट कार्यकर्त्यानी बाळासाहेबांना विरोध केला होता. त्यांच्या धमकीला भिक न घालता कार्यक्रम आयोजकांनी यशस्वीरित्या पार पाडला. रात्री १२ वाजताच्या सुमारास बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यां सोबत नागपूर विमानतळावर पोहोचले, त्यावेळी कार्यक्रमाचे आयोजक दिलीप देवधर सोबत होते, तेथे गप्पा मारत असताना विमानतळावर सात आठ जण “बाळ ठाकरे कोन है’, असे विचारत आले, तेव्हा त्यांनी “मी आहे’ असे सांगितले. “आपसे अभीच बात करना है’, असे हल्लेखोरांनी सांगितले. तेव्हा बाळासाहेबांनी नकार दिला. त्याचवेळी बाळासाहेबांनी चातुर्याने एका जणाच्या कानाखाली वाजविली. तसेच पिस्तूलाची बट त्याच्या कानावर मारल्यामुळे हल्लेखोर जखमी झाला आणि पळून गेला. बाळासाहेबांसोबत असलेल्या शिवसैनिकांनी बाकीच्या हल्लेखोरांना चांगलेच चोपले. विमानतळावरील वातावरण गरम झाले. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वातावरण शांत केले, तो पर्यत बाळासाहेब व त्यांचे दोन सहकारी विमानाने मुंबईला रवाना झाले. ही घटना आजही नागपूरकर विसरले नाही.
पत्रकार संघाला देणगी
१९९२, ९३ मध्ये शिवसेना प्रमुख विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांनी नागपूरच्या पत्रकार संघात पत्रपरिषद आयोजित केली होती, तेव्हा पत्रकार संघ टिनाच्या टपरीसारख्या हाॅलमध्ये होता, पावसाळयात पाणी गळत होते, ही बाब बाळासाहेबाच्या लक्षात आली, त्यांनी लगेच पत्रकार संघाचे पदाधिकारी गणेश शिरोळे, विश्वास इंदूरकर यांना बोलावून एक लाख रुपये देणगी देण्याचे आश्वासन दिले. शिरोळे व इंदूरकर हे दोघे देणगी घेण्यासाठी मुंबईला पोहोचले, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी या दोघांना घेवून मातोश्रीवर गेले. या दोघांचे स्वागत करून झाल्या नंतर या दोघांना बाळासाहेबांनी आपल्या सोबत भोजनाला बसविले. जेवण झाल्या नंतर त्यांना पत्रकार भवन बांधकामा करीता एक लाख रुपयांचा धनादेश स्वाधीन केला. ही पत्रकार संघाला राजकीय नेत्यांकडून मिळालेली पहिली देणगी होती, ही आठवण पत्रकार संघाचे पदाधिकारी आजही विसरले नाही.
संघ भूमीत सभा
१९९५ मध्ये लोकसभा व विधानसभा एकत्रित आली होती. तेव्हा संघभूमी जवळील रेशिम बाग मैदानावर बाळासाहेबांची जाहीर सभा आयोजित केली होती, नागपूर लोकसभेचे युतीचे उमेदवार बनवारीलाल पुरोहित व शिवसेनेचे विधान सभेचे उमेदवार प्रवीण बरडे यांच्या प्रचाराची सभा बाळासाहेबांनी घेतली होती. हे विशेष.
रामटेकवर भगवा फडकला
२००७ मध्ये लोकसभा निवडणूकीत रामटेकवर शिवसेनेचे उमेदवार सुबोध मोहिते यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून रामटेकवर युतीचा भगवा फडकवला. दोन वेळा सुबोध मोहिते यांनी रामटेक लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले. मोहितेंना शिवसेना प्रमुखांनी केंद्रीय मंत्री केले. एवढे देऊनही मोहिते यांनी गद्दारी करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे रामटेकमध्ये पोट निवडणूक झाली. या निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार प्रकाश जाधव यांनी सुबोध मोहितेला धोबी पछाड देवून रामटेक गडावर शिवसेनेचा भगवा फडकवला. त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांनी दोन वेळा लोकसभेत रामटेक मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले.
१० फेब्रुवारी १९९७ मध्ये नागपूर सामना आवृत्तीचे प्रकाशन बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले. हा प्रकाशन सभारंभ नागपूरच्या ऐतिहासीक कस्तूरचंद पार्कमध्ये झाला. या कार्यकमाला लाखो लोक उपस्थित होते, या मैदानाचा साडे तीन लाख लोकांच्या गर्दीचा विक्रम आजपर्यत अटल बिहारी वाजपेयी, शेतकरी संघटनेचे नेते स्व. शरद जोशी, काँग्रेस नेत्या सोनीया गांधी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोडला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या या
मित्रत्व
विको कंपनीचे संस्थापक गजाननराव पेंढारकर हे बाळासाहेबांचे मित्र होते, १९९३ मध्ये बाळासाहेब नागपूरला आले असता त्यांच्या राहाण्याची व्यवस्था पेंढारकर यांनी करोडपती गल्लीतील आपल्या निवासस्थानी केली होती. तेव्हा नागपूरकरांना कळले की बाळासाहेबांची दोस्ती किती घट्ट आहे. बाळासाहेबांची एक खासीयत होती, ते नागपूरात आले की ते आपल्या जुन्या सहकारी लोकांना बोलावून विचारपुस करायचे, त्याचा अनुभव मला आला. “कसा आहेस, घरची मंडळी कशी आहे’, अशी विचारपूस आस्थेने करीत होते. त्यामुळे शिव सैनिकांची बॅटरी चार्ज होत होती. त्यानंतर कार्यकर्ते जोमाने कामाला लागायचे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नागपूरला आले की विदर्भातले शेकडो शिवसैनिक त्यांच्या भेटीला यायचे हे विशेष.
– महेश उपदेव, नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत