केंद्रीय आरोग्य सहसंचालक विवेकानंद गिरी यांची विकसीत भारत संकल्प यात्रेस भेट
लातूर : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्यान विभागाचे सहसंचालक डॉ. विवेकानंद गिरी यांनी लातूर तालुक्यातील चांडेश्वर आणि औसा तालुक्यातील हासेगाववाडी येथे ‘विकसित भारत’ यात्रेला भेट दिली.
गावपातळीवर शासनातर्फे राबवित असलेल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भव योजना यामध्ये प्राधान्याने नागरीकांना मिळणाऱ्या आरोग्य वर्धिनीच्या सेवा ज्यामध्ये रक्तदाब, मधुमेहाची तपासणी व उपचार, आरोग्यदायी जीवनशैलीसाठी विविध कार्यक्रम आदी उपक्रमांची डॉ. गिरी यांनी पाहणी केली.

चांडेश्वर येथे तपासणीस आलेल्या रुग्णासोबत, तसेच आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसोबत डॉ. गिरी यांनी संवाद साधला. दरमहा गावात समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्यवर्धिनीच्या चमुमार्फत आरोग्य विषयक असलेल्या सेवाचा तपशिल नागरीकांकडून जाणून घेऊन समाधान व्यक्त केले. चांडेश्वर आणि हासेगाववाडी येथे विकसीत भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने आयोजित आरोग्य शिबिरामध्ये 340 नागरीकांनी लाभ घेतला, तसेच 113 नागरिकांचे आशामार्फत आयुष्यमान कार्ड काढण्यात आले.

या संकल्प यात्रेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा परिषदेचे उमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) दत्तात्रय गिरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरे, डॉ. पवार, डॉ. बनसोडे, डॉ. बिल्लापटे, डॉ. कोळे, ग्रामपातळीवरील सर्व पदाधिकारी, अधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


