१७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
लाखनी येथील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल
लाखनी :- (कालिदास खोब्रागडे) येथील पोलिस ठाण्याचे हद्दीतील एका गावातील १७ वर्षीय विद्यार्थिनी संगणकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी एका प्रतिष्ठित संगणक संस्थेत येत असून प्रशिक्षण संपल्यानंतर गावी जाण्याकरिता एका खासगी प्रशिक्षण संस्थेत मैत्रिणीकडे गेली असता ३५ वर्षीय नराधमाने तिचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी(ता.२२) सकाळी ११:०० वाजता दरम्यान घडली. पीडितेच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी युवकाचे नाव मुकेश उर्फ सोनू केशव बोरकर(३५) रा. गुंथारा, तालुका भंडारा असे आहे. पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
लाखनी शिक्षणाचे माहेर घर असल्यामुळे सर्व प्रकारचे शिक्षण व प्रशिक्षण देणाऱ्या संस्था शहरात उपलब्ध आहेत. ग्रामीण परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण व प्रशिक्षणासाठी दररोज लाखनी शहरात येत असतात. लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १७ वर्षीय पिडीत विद्यार्थिनीने उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे संगणक प्रशिक्षणाचे वर्ग लावले असून त्यासाठी ती स्वगावाहून मैत्रिणीसोबत जाणे येणे करीत असे. संगणक प्रशिक्षण वर्ग संपल्यानंतर ती पिडीत विद्यार्थिनी एका खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या मैत्रिणीकडे गेली असता आरोपी युवकाने तिचा पाठलाग करून तिला गाठले व तू माझे सोबत का बोलत नाहीस असे बोलून माझ्या गाडीवर बस असे म्हणून पिडीतेच्या केसांची ओढाताण करून दुपट्टा ओढला व पिडीत अल्पवयीन युवतीला जवळ ओढून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याने तसेच तुला जे करायचे आहे ते कर अशी धमकी दिल्याने पिडीत अल्पवयीन विद्यार्थिनीच्या फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक १६२/२०२४ कलम ३५४(अ)(ड), ५०६ भादवी तथा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे सहकलम ८ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चीलांगे तपास करीत आहेत. या घटनेमुळे ग्रामीण परिसरातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

