मानधनाअभावी संगणक परिचालकावर उपासमारीची वेळ
६ महिन्यापासून मानधन नाही
कालिदास खोब्रागडे,
लाखनी :- डिजिटल महाराष्ट्र घडविण्याचे ध्येय उराशी बाळगून तुटपुंज्या मानधनात काम करणाऱ्या संगणक परीचारकास मागील ६ महिन्यापासून मानधन दिले गेले नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. उपाशी पोटी काम कसे करावे ? असा प्रश्न आवासून उभा असून आर्थिक अडचणीमुळे कुटुंबात कलह निर्माण झाले असून आवश्यक वस्तू उधारीवर मिळेनाशा झाल्या असल्यामुळे प्रपंचाचा गाडा हाकणे अशक्यप्राय बाब झाली असल्याने संगणक परीचालकाचे थकीत मानधन तात्काळ अदा करण्यात यावे. अशी मागणी संगणक परिचालक तथा सामाजिक कार्यकर्ता अजय हेमने यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वित्त आयोग प्रकल्पा अंतर्गत मागील १० ते १२ वर्षापासून ग्राम पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर संगणक परिचालक प्रामाणिकपणे आपली सेवा देत असून जन्म-मृत्यू-विवाह, नमुना ८, क्रियासॉफ्ट, १ ते ३३ नमुने, विविध शासकीय योजना व इतर कार्यालयीन सेवा, गावकऱ्यांना विविध प्रकारचे आवश्यक ते प्रमाणपत्र एकाच छताखाली संगणक परिचालकाचे माध्यमातून देण्यात येतात. हा प्रकल्प संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र(संग्राम) म्हणून कार्यरत होता. असे अजय हेमने यांनी सांगितले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने सी.एस.सी. या खासगी कंपनीमार्फत “आपले सरकार सेवा केंद्र” चालविले जात आहे.
ग्रामपंचायत स्तरावर १५व्या वित्त आयोगामार्फत १२ हजार रुपये प्रति महिना या प्रमाणे वार्षिक एकत्रित मानधन जिल्हा परिषदेला आरटीजीएस व्दारे ग्रामपंचायतीकडून अदा केले जाते. मात्र संगणक परीचालकास ६ हजार ९०० रुपये मानधन देऊन संगणक परीचलकाचे आर्थिक शोषण केले जाते. पण मानधन वेळेवर आणि दरमहा कधीच मिळत नाही. त्यामुळे संगणक परीचालकाला आर्थिक विवंचनेत जीवन यापन करावे लागते. या बाबीस कंटाळून काही संगणक परिचालकाकडून आत्महत्याही केल्या असल्याचे सामाजिक कार्यकर्ता अजय हेमने यांनी सांगितले. या प्रकाराने आपले सरकार सेवा केंद्र चालविणाऱ्या खासगी कंपनीकडून दिवसाढवळ्या संगणक परिचालकांची लूट होत असल्याचे शासन उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
संगणक परिचालक तुटपुंज्या मानधनावर आपली सेवा देत असला तरी त्याला वेळेवर मानधन कधीच मिळाले नाही. त्यामुळे तो आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यास असमर्थ ठरत असून कौटुंबिक कलहात वाढ होत आहे. औषधोपचाराअभावी कुटुंबातील वृद्ध व्यक्तींचा मृत्यू झाला तर लहान बालके कुपोषणाच्या खाईत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. संगणक परिचालकाचे कुटुंबाचा विचार करून त्यांचे ६ महिन्यापासून थकलेले मानधन तत्काळ अदा करण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अजय हेमने यांनी केली आहे.

