शेतातच गळफास घेऊन शेतकऱ्याने संपविली जीवन यात्रा
कुडेगाव येथील घटना, पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
कालिदास खोब्रागडे,
लाखनी :- मागील काही दिवसांपासून अज्ञात चिंतेने त्रस्त असलेल्या एका शेतकऱ्याने शेतातीलाच कडूनिंबाचे झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी(ता.२४) रोजी रात्री ७:३० वाजता दरम्यान कुडेगाव शेतशिवारात उघडकीस आली. मृतक शेतकऱ्याचे नाव तुलाराम ढोरे(५५) रा. कुडेगाव, तालुका लाखांदूर असे आहे. लाखांदूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मृतक तुलाराम अल्प भूधारक शेतकरी असून शेतीस जोडधंदा म्हणून साउंड सर्व्हिस चा व्यवसाय करीत होते. त्यामुळे ते सधन शेतकरी म्हणून गणले जात असले तरी मागील काही दिवसापासून ते अज्ञात कारणामुळे तणावात राहत असत. बुधवारी कुटुंबीयांना काहीही न सांगता सायंकाळचे सुमारास घराबाहेर पडले. पण बराच वेळ होऊनही घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता स्वतःचे शेतातील कडूनिंबाचे झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे, पोलिस हवालदार विलास मातेरे, संदीप बावनकुळे, मिलिंद बोरकर, उमेश शिवणकर इत्यादींनी घटनास्थळी जाऊन कुटुंबियांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून सर्व सोपस्कार आटोपून मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखांदूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मन मिळावू तुलाराम ढोरे च्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

