दुतर्फा वृक्ष लागवडीमुळे रस्त्याचे सौंदर्यात पडेल भर
• नामदेव बनकर ते शिवणी/बांध जलाशय रस्त्यावरील प्रकार
• सामाजिक वनीकरण विभागाचा स्तुत्य उपक्रम
कालिदास खोब्रागडे, लाखनी :- स्वतःचे मालकीची जागा उपलब्ध नसतांना ग्रामपंचायतीचे पडीक जागा अथवा रस्त्याच्या कडेला दुतर्फा वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेल्या सामाजिक वनीकरण विभाग साकोली चे वतीने २ वर्षापूर्वी नामदेव बनकर ते शिवणी/बांध जलाशयापर्यंत लागवड केलेल्या १ हजार रोपांपैकी आजघडीस ९७० जिवंत झाडे असून ५ ते ६ फूट उंची असल्यामुळे या रस्त्याचे सौंदर्यात भर पडला असून विभागीय वन अधिकारी लक्ष्मण आवारे तथा वन परिक्षेत्र अधिकारी विलास बेलखोडे यांचे मार्गदर्शनात वृक्ष लागवड करण्यात आली.
अवैध वृक्षतोडीने वनांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने पर्यावरणाचा सातत्याने ऱ्हास होत असून वातावरणात बदल होत असल्यामुळे पर्यावरण टिकविण्यासाठी वृक्ष लागवड, संरक्षण व संवर्धन महत्त्वपूर्ण झाले आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडे मनुष्य बळासह जागेचाही अभाव असल्यामुळे वृक्ष लागवडीसाठी महसूल किंवा ग्रामपंचायतीचे मालकीच्या पडीक जागा अथवा बांधकाम विभागाकडे असलेल्या रस्त्यांवर अवलंबून राहावे लागत असते. सामाजिक वनीकरण भंडारा चे विभागीय वन अधिकारी लक्ष्मण आवारे, साकोली चे वन परिक्षेत्र अधिकारी विलास बेलखोडे यांचे मार्गदर्शनात आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये नामदेव बनकर ते शिवणी/बांध जलाशयापर्यंत २ किलोमीटर पांदन रस्त्याचे दुतर्फा कडुनिंब, बेहळा, कदंब, आंबा, सीताफळ, जांभूळ, शिशु, रिठा, शिवण, करंज, काळा शिषम, पिंपळ, वड इत्यादी प्रजातीच्या १ हजार रोपांची लागवड करण्यात आली. यावर सनियंत्रण व देखरेखीचे काम वनरक्षक कुमारी प्रतिमा आंबुले यांचेवर सोपविण्यात आले. त्यांनी स्थानिक मजूरांकडून योग्य रीतीने देखभाल, आवश्यक त्यावेळी फवारणी व उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था केल्याने आजघडीस १ हजार रोपांपैकी ९७० जिवंत रोपे असून उंची ५ ते ६ फूट आहे. टक्केवारी ९७ टक्के आहे. सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनेक अडचणींवर मात करून झाडे जगविल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. यांचा इतरांनी आदर्श घेणे गरजेचे झाले. या प्रकाराने पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल.

