रेती माफिया ठरले सहाय्यक पोलीस निरीक्षकापेक्षा वरचढ…!
• भूगाव रेती घाटातील प्रकार, चौकशी ची गरज
कालिदास खोब्रागडे, लाखनी :- पालांदूर पोलिस ठाण्याचे हद्दीत असलेल्या चुलबंद नदी पात्रातील भूगाव रेती घाटातील रेती माफियांकरवी अवैध रेती उपसा व ओव्हरलोड वाहतूक सुरू असली तरी रेती तस्करी थांबविण्यास स्थानिक स्वराज्य संस्थेसह पालांदूर चे सहाय्यक पोलीस निरीक्षकही हतबल दिसून येत असल्याने पाणी कुठं मुरते हा संशोधनाचा विषय झाला असून हात ओले झाल्या शिवाय रेती तस्करी शक्यच नाही. स्थानिक ठाणेदार व रेती माफिया यांचे अर्थपूर्ण संबंध आहेत का ? याची सहनिषा करण्यासाठी भ्रमणध्वनीवरील कॉल्स डिटेल्स ची तपासणी केल्यास सत्यता समोर येण्यास फार वेळ लागणार नाही.
चुलबंद नदी लाखनी तालुक्याची जीवन दायीनी असून या नदीमुळे लाखनी व साकोली तथा लाखनी व लाखांदूर तालुक्याची सीमा निश्चित झाली आहे. चुलबंद नदीत पांढरी शुभ्र बारीक व दर्जेदार रेती असल्यामुळे जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातही बांधकाम व्यवसायिकाकडून प्रचंड प्रमाणात मागणी असली तरी रेती घाटाचे लिलाव नसल्यामुळे रेती तस्करांचा उदय झाला. ह्या रेती तस्करांकडून अधिक दराने रेती विक्री करणे, स्थानिक लोक प्रतिनिधी, गावकरी व शेतकऱ्यांना न जुमानता मनमर्जीने कुठूनही रस्ते तयार करणे, कुठेही रेती डम्पिंग करणे, कोणी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तर दमदाटी करणे, आम्ही पोलिसांना हप्ता पोहचवितो त्यामुळे आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही. या सारखे बेताल वक्तव्य करून जनतेस वेठीस धरण्याचे प्रयत्न रेती माफियाकडून सातत्याने होत असल्याने रेती माफिया विरोधात जनमत तयार होऊन घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती पुरवठा करण्यात यावा. अशी मागणी जोर धरू लागली.
जनतेच्या मागणीचा आदर करून शासनाने लाखनी तालुक्यातील चुलबंद नदी पात्रातील पळसगाव व वाकल येथे रेती डेपो तयार करून भूगाव वगळता इतर सर्व रेती घाट या रेती डेपोंना जोडण्यात आल्याने न्याहारवानी, पालांदूर, पहाडी, कवडशी येथील रेती तस्करांनी स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याशी संधान साधून महिन्याकाठी ठराविक रक्कम देऊन चुलबंद नदी पात्रातील भूगाव रेती घाटातून या रेती माफियांकरवी दररोज विना क्रमांकाच्या अंदाजे २७ ट्रॅक्टर व्दारेm रात्रंदिवस १५० ते २०० ब्रास रेतीचा अवैध उपसा राजरोसपणे सुरू असून ओव्हरलोड रेती वाहतूकही सुरू आहे. हा प्रकार मागील दीड ते दोन महिन्यापासून सुरू असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. रात्री बेरात्री ट्रॅक्टर च्या आवाजामुळे गावकऱ्यांना त्रास होऊन गावकरी रेती माफियांचे विरोधात जाऊ नये. या करिता न्याहारवानी, पालांदूर, पहाडी व कवडशी येथील रेती माफियांनी भूगाव येथील ४ ते ५ ट्रॅक्टर भाड्याने घेतल्याची शक्कल लढवून गावकऱ्यांचा विरोध हुसकवूकाव लावला.
भूगाव रेती घाटातील रेतीचा अवैध उपसा व वाहतूक होत असल्याचे तालुक्यासह जिल्ह्यातही माहिती असताना पालांदूर पोलिस ठाणे या पासून कसे अनभिज्ञ राहू शकते ? हे न समजण्या पलीकडील आहे. यावरून या रेती मफियांशी पालांदूर ठानेदाराचे साडेलोटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच या रेती माफियांचं हिम्मत वाढून आपले कोणी काही बिघडवू शकत नाही अशी भावना निर्माण झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या रेती माफियांचे स्थानिक ठाणेदाराशी अर्थपूर्ण संबंध आहे का ? या करिता त्यांच्या भ्रमणध्वनीची चौकशी केल्यास सत्यता समोर येण्यास फार वेळ लागणार नाही. असे जाणकारांचे म्हणणे आहे. स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यास मॅनेज केल्याशिवाय रेती तस्करी शक्य नाही. पण भूगाव रेती घाटातून खुलेआम रेती यासरी सुरू असल्याने रेती माफिया ठरले सहाय्यक पोलीस निरीक्षकापेक्षा वरचढ. अशा खमंग चर्चांना पेव फुटले आहे.

