लाखोरी ग्रामपंचायत कमिटीच्या प्रयत्नाने पाणी पुरवठा सुरू  पंचायत समिती सदस्याचेही सहकार्य

महाराष्ट्र
Share

लाखोरी ग्रामपंचायत कमिटीच्या प्रयत्नाने पाणी पुरवठा सुरू

 पंचायत समिती सदस्याचेही सहकार्य

 

कालिदास खोब्रागडे, लाखनी :- तालुक्यातील लाखोरी पाणी पुरवठा योजनेचे जलस्त्रोत कोरडे पडल्याने गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. पंचायत समिती सदस्य सुनील बांते यांचे मार्गदर्शनात सरपंच सुधीर चेटूले, ग्रामसेवक योगेश माटे, उपसरपंच दिवाकर बांते व ग्रामपंचायत कमिटीने १५वा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर मधून विंधन विहीर तयार केली. तसेच सुरेश टीचकुले यांचे मालकीची बोअर अधिग्रहित करून गुरुवार(ता.२) पासून गावातील पाणी पुरवठा सुरळीत सुरू केला असून जलजीवन मिशनच्या कामामुळे अनेक ठिकाणी पाइपलाईन फुटलेली असल्यामुळे काही कुटुंबांना पर्याप्त पाणी उपलब्ध होत नसल्याचे सरपंच सुधीर चेटुले यांनी सांगितले.
टेकडीवर वसलेल्या लाखोरीची लोकसंख्या अंदाजे ३ हजार असून कुटुंब संख्या ६८१ आहे. गावकऱ्यांना पारंपरिक जलस्त्रोतातून पिण्याचे पाण्याची व्यवस्था होत असे. गावकऱ्यांना स्वच्छ व शुद्ध जल पुरवठा व्हावा. या करिता २०१७ मध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा चे वतीने दीड लाख लीटर क्षमतेची पाणी पुरवठा योजना तयार करण्यात येऊन २ ठिकाणाहून जलस्त्रोत निर्मिती करण्यात आल्याने गावकऱ्यांना नियमित पाणी पुरवठा होत असे. पण २०२३ मध्ये काही शेतकऱ्यांनी या जलस्त्रोतालगत खासगी विंधन विहिरी तयार करून दुबार तीबर पिके घेत असल्याने पाणी पुरवठा योजनेचे जलस्त्रोत एप्रिल चे मध्यातच कोरडे पडल्याने गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे जनतेला आवश्यक ते पाणी उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायतीचे वतीने टँकर ची व्यवस्था करण्यात आली. तथा गावातील पाणी टंचाईची समस्या प्रशासनाला माहिती व्हावी. या करिता गटविकास अधिकारी पंचायत समिती लाखनी तसेच तहसीलदार लाखनी यांना पंचायत समिती सदस्य सुनील बांते, सरपंच सुधीर चेटुले, ग्रामसेवक योगेश माटे, उपसरपंच दिवाकर बांते, सामाजिक कार्यकर्ता अंकुश कानतोडे यांचे मार्फत निवेदन देण्यात आले होते.
तालुका प्रशासनाने लाखोरी येथील पाणी टंचाई बाबद पाणी पुरवठा विभागास माहिती दिल्याने पाणी पुरवठा विभाग खडबडून जागा झाला. उपविभागीय अभियंता नीलम हलमारे मॅडम, यांत्रिकी विभागाचे अभियंता कुंदलवार, तांत्रिक विभागाचे नशिने गावात दाखल होऊन ग्रामपंचायत कमिटीशी चर्चा करून गावात इतर ठिकाणी जलस्त्रोताचा शोध घेण्यात आला. मनीराम हंबरे यांचे घरालगत, गिरधारी मते यांचे शेताजवळ, स्मशानभूमी तसेच आलेसुर रस्त्यावरील पाटलीनची विहीर या ठिकाणी जलस्त्रोताचा शोध घेऊन पर्याप्त पाणी असल्याची कबुली दिली.
ग्रामपंचायतीचे वतीने मनीराम हंबरे यांचे घरालगत १५वा वित्त आयोगाअंतर्गत बोअर मारण्यात आली. २०० फूट खोदकाम करूनही पाणी लागले नाही. लगेच दुसऱ्या दिवशी गिरधारी मते यांचे शेताजवळ बोअर खोदकाम केले असता पर्याप्त पाणी लागले. त्याच प्रमाणे भविष्यात गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये. या करिता सुरेश टीचकुले यांची खासगी बोअरवेल त्यांचे संमतीने अधिग्रहित करून पाइपलाईन व्दारे जलकुंभात पाणी सोडून गावकऱ्यांना नळाव्दारे गुरुवार(ता.२) पासून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असला तरी गावात जलजीवन मिशन चे पाइपलाईनचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी पाइपलाइन फुटली असल्यामुळे काही कुटुंबांना पर्याप्त पाणी पुरवठा होत नसल्याचे सरपंच सुधीर चेटूले यांनी सांगितले. पाणी टंचाईच्या कालावधीत लवकरात लवकर गावकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावे. या करिता ग्रामपंचायत कमिटीने आवश्यक त्या उपाययोजना केल्यामुळे १० ते १२ दिवसांत गावकऱ्यांची पाणी टंचाईची समस्या दूर केल्याने पंचायत समिती सदस्य सुनील बांते, सरपंच सुधीर चेटुले, ग्रामसेवक योगेश माटे, उपसरपंच दिवाकर बांते, ग्रामपंचायत सदस्य विलास बांते, मनोज रामटेके, रजत सिंगनजुडे, मनोज मौदेकर, तथा पाणी पुरवठा कर्मचारी संदीप चेटूले यांनी अथक परिश्रम घेतल्यानेच पाणी टंचाईची समस्या मार्गी लागली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत