रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्र तत्काळ सुरु करा लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

महाराष्ट्र
Share

रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्र तत्काळ सुरु करा

लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कालिदास खोब्रागडे, लाखनी :- येथील तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने लाखनी तालुक्‍यात रब्बी हंगामात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, ई-पिक सर्वेक्षणात तांत्रीक अडचणीमुळे नोंदी न झालेल्या शेतकऱ्यांना ऑफ लाईन पद्धतीने नोंदी करण्यात याव्या. या करिता तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष योगराज झलके यांचे नेतृत्वात नायब तहसिलदार उर्कुडकर यांचे मार्फत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना शुक्रवार(ता.३) रोजी पाठविलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.
सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी तालुक्यात उन्हाळी हंगाम २०२३-२४ मध्ये ५ हजार ५०० हेक्टर हशेत्रात धान पिकाची लागवड केली होती. आता धान परिपक्व झाला असून कापणीला आला आहे. मात्र धान खरेदी केंद्राबाबत साशंकता निर्माण झाली होती. ई-पिक, पिक पाहणी सर्वेक्षणात तांत्रिक अडचणीमुळे ७/१२ वर नोंदी होवू न शकल्यामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होत आहे. तरी अश्या शेतकऱ्यांना ऑफ लाईन ७/१२ वर नोंदीचे आदेश देवून सहकार्य करावे. रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू करण्यासंबंधाने अजूनपर्यंत कोणतीही प्रक्रिया सुरु झालेली नाही. खरीप हंगामातील धानाची उचल भरडाईसाठी करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्वच गोदाम हाउसफुल्ल आहेत. त्यामुळे उन्हाळी हंगामातील खरेदी केलेला धान कुठे ठेवावा ? असा प्रश्न अभिकर्त्या संस्थांना पडला आहे.
निवेदनानुसार २०२३-२४ या वर्षातील रब्बी हंगामात धान पीक निघून पंधरवड्याचा कालावधी झाला. मात्र, तालुक्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना कमी भावाने धानाची विक्री व्यापाऱ्यांना करावी लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. शेतकऱ्यांची ही आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी त्वरित शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे. अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. संततधार पावसामुळे यापूर्वी शेतकऱ्यांकडील धानाची प्रत खालावली आहे. त्याचाही उत्पन्नावर परिणाम होणार आहे. व्यापारीदेखील याच कारणामुळे कमी दराने धान खरेदी करीत आहेत. हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाल्यास काही अशी स्पर्धा वाढून दरात तेजी येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या संदर्भाने वेळीच निर्णय घेण्यात यावा. अशी मागणी लाखनी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष योगराज झलके यांचे नेतृत्वात निवेदनाच्या प्रतीने करण्यात येत आहे.
काही दिवसांतच पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. परंतु धानाची उचल अद्यापही करण्यात आली नाही. त्यामुळे धान भिजण्याची शक्यता आहे. यात शासनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. त्यामुळे तात्काळ धानाची उचल करावी. अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदन देते वेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष योगराज झलके, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. शफी लद्धानी, जि. प. सदस्या विद्या कुंभरे, पं. स. सभापती प्रणाली सार्वे, प.स. सदस्य विकास वासनिक, माजी जि.प. सदस्य आकाश कोरे, माजी उपसभापती विजय कापसे, लाखनी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष मोहन निर्वाण, जिल्हा महासचिव राजु निर्वाण, तालुका सेवादल अध्यक्ष अनिल बावनकुळे, तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष धनपाल बोपचे, विनोद भुते, महादेव गायधनी, मधुकर गिदमारे, भागवत नागलवाडे, परवेज आकबानी, देविदास बेलखोडे, संजय कांबळे, अजय वालदे, निखिल सिंगनजुडे, मयुर खरवडे, अशोक मेश्राम, देवा ढेंगे, हेमंत बडवाईक, गंगाधर लुटे व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत