शाळेतील रफ वहीतील शेवटली पाने
नवीन वर्गात गेल्यावर जुन्या वर्गातील वहीचे कोरे पाने नीट कापून रफ वही तयार
आज रफ वहीची एकाएकी आठवण झाली व रफ वहितील शेवटली पाने डोळ्यासमोर येऊन बोलू लागली.काय न्हवते त्या पानांमध्ये. सबकुछ आनंदी आनंद.बऱ्याच नोंदी होत्या. वर्गात कंटाळा आला तर सोबत द्यायची रफ वहितील शेवटली पाने.आपला सच्चा मित्र.बरे आपण जे उपद्व्याप करायचो ते आपसूकच शेजारी बसलेली मित्राला दाखवणे हे नित्यकर्म होते. बरेच गुपित दडलेली होती त्या रफ वहीत.बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी होत्या, चित्रकला होती, एकमेकांना निरोप होते व कट्टीगट्टी पण होती. रफ वही हे एक वेगळेच विश्व होते.प्रत्येक विषयाला वेगवेगळी पाने होती.घरी याच रफ वहितुन
फेअर वहीत विषयानुसार लिहून काढणे हा एक उद्योग होता. आयुष्य म्हणजे दुसरे काय असते. आयुष्यातील रफ नोंदींचा परिणाम आपल्यावर नक्कीच होत असतो.आपल्यास लहानपणी कशी वागणूक मिळत होती याची नोंद लहानपणीच्या रफ वहीत होती. व आज काळ बदलल्यावर कशी वागणूक मिळते याची नोंद लिहायला आज लहानपणीच्या रफ वही नाही,येवढाच काय तो फरक आहे. या वहितील कच्च्या नोंदी या कधीच मिटू शकत नाही एवढे मात्र खरे. पदोपदी आज याचा अनुभव येतोच.
या रफ वहितील शेवटल्या पानांवर निरोपाची देवाणघेवाण व्हायची.ठिपक्या ठिपक्यांच्या खेळ असायचा. चौकोनी डब्बे बनविले हा खेळ होता. मास्तरांचा फोटो होता.देवळाचे चित्र असायचे.उगवता सूर्य,डोंगर,नदि व बस चे चित्र रफ वहीत असायचेच.
जोशी मास्तर साने गुरुजी सारखे दिसतात असे लिहलेले असायच.
गणित हा विषय का शिकवतात व आज गणिताचे मास्तर हसले असे पण लिहिलेले आठवते.
आज मी खेळायला येणार नाही कारण आज मावशी येणार आहे. मन मोकळे करण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रफ वही. रफ वहीत लिहलेले बाजूच्या मित्रास दाखवणे असायचेच. मन्याने रफ वहीत लिहलेले एक वाक्य आजही आठवते,
मला काकांची भीती वाटते ते मारतात.
अनेक लहानसहान गोष्टींची नोंद रफ वहीत असायची.आज आमच्याकडे आंबे आणले. जर कोणाशी भांडण झाली तर शेजारची काकू किंवा मावशी आपल्या मुलाला म्हणायची याच्या सोबत खेळु नकोस.
मन्या, माझ्याबरोबर खेळू नको असे तुझी आई म्हणाली का,तू खरच खेळणार नाही का हे सुध्दा रफ वहीवर लिहून मन्यास दाखवावे लागायचे. सिनेमा नवा लागला तर त्याबद्दल सुध्दा रफ वहीत नोंद असायची.
जागृती सिनेमा पहा,खूप चांगला आहे.
पण रडू येतो रे.कधी कधी आपण मोठेपणी काय होणार हेही रफ वहीत लिहिलेले आठवते.
मी मोठेपणी इंजिन ड्राइवर होणार खूप फिरायला मिळेल.
तुझे वडील डॉक्टर आहे तू डॉक्टरच होणार.
अश्या कित्येक चांगल्या वाईट गोष्टींची नोंद या रफ वहीत असायची.
या लहानपणीच्या निरागस आठवणी मोठेपणी आठवतात. रफ वहितील नोंदी मात्र भविष्यातील वाटचालित उपयोगी पडतात व त्यामुळे आयुष्यातील प्रवास सुकर होतो यात शंकाच आहे.
अशी ही आपल्या सर्वांची जिवाभावाची मैत्रिणीला आज आपण मुकलो पण आजही ती आठवणीत जिवंत आहे.
आज ते बालपणीचे मित्र कोठे असतील याची कल्पना नाही पण आठवणीतील रफ वहीत मात्र ते रोज आठवतात.
रफ वहीत ठेवलेले मोरपीस,विद्येचे पान व पिंपळाचे जाळीदार पान आजही आठवते. रफ वही ही नुसती रफ न्हवती तर आठवणींचा जिवंत पेटारा होता.खरच खूपच बोलकी होती रफ वही .
आपल्या सर्वांना नक्कीच रफ वही आठवत असेल.
त्या रफ वहिला सलाम


