मरीन ड्राईव्हच्या गर्दीचा अर्थ….
हातरस येथे चेंगराचेंगरीत माणसे मेली तरीही जीवाची पर्वा न करता मरीन ड्राईव्हवर इतकी प्रचंड गर्दी जमली..देशात इतके प्रश्न असताना लोक क्रिकेटला इतके का महत्व देतात ? यावर खूप टीका झाली.. हे का घडते ? याचे विश्लेषण करण्याचा हा एक प्रयत्न.
या देशात आज मध्यमवर्गाची संख्या ३१ टक्के म्हणजे ४४ कोटी झाली आहे. त्यात ३० लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळवणारी संख्या ६ कोटीपेक्षा जास्त आहे. हा वर्ग हीच आज समस्या झाला आहे. पोर्शे गाडीने उडवणारा तरुण, अंबानींच्या लग्नापासून अयोध्येत प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे निमंत्रण असलेला हाच वर्ग आहे.
हाच वर्ग आर्थिकदृष्ट्या स्थिरावल्यामुळे त्याला आयुष्य म्हणजे एक इव्हेंट करायचा आहे. आयुष्य त्यांच्यासाठी एक मनोरंजन आहे. हाच वर्ग प्रत्येक प्रश्नात मनोरंजन मूल्य शोधतो आहे.
बाजार कंपन्यांनी याच वर्गाला ग्राहक बनवणे समजू शकतो पण तिथपर्यंत हा वर्ग थांबत नाही तर या मनोरंजनाचे ओझे त्याने मीडियावर लादले आहे. त्यामुळे ग्राहक असलेल्या या वर्गाची मनोरंजन भूक पूर्ण करण्यासाठी या वर्गाचा मनोरंजन अजेंडा राबवते आहे…
या वर्गासाठी देशाचे आर्थिक, सामाजिक प्रश्न संपलेले आहेत कारण त्यांचे ते प्रश्न नाहीत. याचा परिणाम असा होतो आहे की प्रत्येक प्रश्नात फक्त मनोरंजन आता हवे आहे. निवडणुका या देशाचे गंभीर प्रश्न चर्चा होण्यासाठी साधन असतात पण या निवडणुका हे ही या वर्गाने मनोरंजन म्हणून वापरल्या. त्यांच्या अपेक्षा लक्षात घेवून माध्यमे ही देशाचे आर्थिक, सामाजिक प्रश्न यावर चर्चा न घडवता नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य, एकमेकावरची चिखलफेक,नेत्यांना हिरो व्हीलन करणे,निवडणुकीतील नाट्यपूर्ण घटना दाखवतात..त्यात मनोरंजनाची उत्तेजना मिळते..
त्यातून देशाचे आर्थिक प्रश्न पुढेच येत नाही….
क्रिकेट हा तर मनोरंजन क्लायमॅक्स. तेव्हा हा रिकामटेकडा वर्ग त्यातून मोठ्या प्रमाणावर उत्तेजना घेतो. मीडिया या ग्राहकाला खुश करण्यासाठी आणि त्या TRP वर जाहिरात साम्राज्य उभे करतो. सट्टेबाजी आणि इतर व्यवसाय फुलून येतात…त्यामुळे माध्यमांनी क्रिकेट जणू एखाद्या जागतिक महायुद्ध दाखवावे तसे दाखवले …क्रिकेटयोद्धे शब्द वापरले जातात…जिंकणे हरणे म्हणजे जीवन मरण दाखवून त्यांनी हा उन्माद तयार केला…मरीन ड्राइव्हची गर्दी हा त्याचा दृश्य परिणाम आहे…
पण या गर्दीत तो ६ कोटी उच्च आर्थिक वर्ग येत नसतो…तो घरी बसून ही गंमत बघत असतो. तिथे सामान्य घरातील पोरे लोकलने जाऊन गर्दी करतात..कारण माध्यमांनी त्यांना उत्तेजित केलेले असते.
माध्यमे या वर्गाचा अजेंडा थेट तळापर्यंत नेतात..अगदी आदिवासी पाड्यावर ही आता त्यांचे पारंपरिक खेळ सोडून पोरे क्रिकेट खेळत असतात…सामान्य कुटुंबातील पोरे बायका ही काम सोडून क्रिकेट बघत राहतात ..या कुटुंबांना त्यांची रोजची दुःखे विसरायला असे आनंद अफू म्हणून काम करतात…
त्यामुळे हा उन्माद केवळ ४४ कोटी जनतेचा न होता दुपटीपेक्षा जास्त जनतेचा होतो…
पूर्वी राजकपूरचे चित्रपट गरीब सामान्य माणसे यांचे जग दाखवत पण आता चित्रपटातून गरिबी हटली आहे..थेट परदेशात शूटिंग होते आहे. करोडोंची गुंतवणूक करावी लागते. उच्च आर्थिक वर्गाचे मनोरंजन एवढंच उरले आहे..
या सर्वांचा परिणाम असा होतो की देशाचे खरे प्रश्न या मीडियाच्या बॉर्डरबाहेर जात आहेत…आणि नॉन इश्यू असलेले मुद्दे मात्र
षटकार मारत आहेत…ही खरी वेदना आहे..
© हेरंब कुलकर्णी
ताजा कलम : आणि मग या स्पर्धेत राजकारणी मागे राहत नाहीत.या बोलक्या वर्गाच्या दैवतांना ११ कोटीचा नैवेद्य दाखवतात.


