मतदान चिठ्ठी पोहचली नाही तर हेल्पलाईन क्रमांकावर करा थेट तक्रार

NAGPUR
Share

*मतदान चिठ्ठी पोहचली नाही तर हेल्पलाईन क्रमांकावर करा थेट तक्रार*

 

▪️तक्रार आल्यास होणार कठोर कारवाई

– जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

▪️प्रत्येक मतदारांच्या घरी मतदान चिठ्ठया वाटपासाठी निवडणूक विभागाद्वारे 4631 बीएलओंची नियुक्ती

 

▪️7757988898 हेल्पलाईन क्रमांक जाहीर

 

नागपूर,दि. 12 : विधानसभा 2024 निवडणुकांसाठी प्रत्येक मतदाराला आपल्या मतदान केंद्राची माहिती व्हावी, मतदार क्रमांकाबाबत खातरजमा व्हावी यासाठी निवडणूक विभागाने घरोघरी मतदारापर्यंत पोहचून चिठ्ठी वाटपासाठी बीएलओंची नियुक्ती केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रनिहाय बीएलओ नियुक्त केले असून त्यांच्या जवळ मतदार निहाय सर्व मतदान चिठ्ठया सुपूर्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर जबाबदारीही सोपविण्यात आलेली आहे. मतदान चिठ्ठया वेळेत मतदारापर्यंत न पोहचल्यास 7757988898 हेल्पलाईन क्रमांकावर थेट आपल्या पत्त्यासह तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया येत्या २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. मतदारांना मतदानाच्या ४८ तासापूर्वी पर्यंत मतदान चिट्ठी पोहोचवणे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना अनिवार्य करण्यात आले आहे. सर्व मतदारांना मतदानाच्या ४८ तासापूर्वीच मतदान चिठ्ठी प्राप्त होतील असे आदेश मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना देण्यात आले आहेत. यामुळे सर्व मतदारांना आपल्या मतदान केंद्राची माहिती मतदानापूर्वीच मिळेल आणि मतदार मतदानापासून वंचित राहणार नाहीत असा विश्वास जिल्हाधिकारी इटनकर यांनी व्यक्त केला.

 

जे बीएलओ या मतदान चिठ्ठया घरोघरी पोहोचविणार नाहीत त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पर्यवेक्षकीय टिम तयार करण्यात आलेल्या आहेत. ज्यांच्याकडे बीएलओ आले नाहीत त्यांनी आपली तक्रार नोंदविण्यासाठी हेल्प लाईन क्र. 7757988898 उपलब्ध करून दिला आहे. तक्रार नोंदवीत असतांना संबंधितांनी स्वतःचे पूर्ण नाव, आपल्या मतदान ओळखपत्रावरील EPIC क्रमांक, मोबाईल नंबर,आपल्या मतदार संघाचे नाव व रहिवासाचा पूर्ण पत्ता नमूद करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

 

या प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी मतदारांना आपली मतदान चिठ्ठी प्राप्त न झाल्यास मतदारांना वोटर हेल्पलाईन ॲप किंवा वोटर्स सर्व्हिस पोर्टलचा वापर करून देखील स्वत:च्या मतदान केंद्राबाबतची माहिती मिळविता येईल. माहिती मिळविण्यासाठी EPIC क्रमांक किंवा मोबाईल नंबरचा वापर मतदारांनी करावा.

 

जिल्ह्यातील सर्व मतदारांनी “आपले एक मत, अमुल्य मत” या भावनेतून मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी (SVEEP) विनायक महामुनी यांनी केले.

 

निवडणूक विभागातर्फे मतदारांच्या साक्षरतेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व 40 टक्केपेक्षा जास्त विकलांग असलेल्या मतदारांना गृह मतदाराची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे. याच बरोबर प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांच्या प्राथमिक सुविधेकडे लक्ष देण्यात आले आहे. निवडणूक आयुक्तांकडून सर्व सुविधांबाबत वेळोवेळी आढावा घेतला जात असून प्रत्येक मतदाराला आपल्या मतदानाचे कर्तव्य बजावता यावे यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचे महामुनी यांनी स्पष्ट केले.

 

Chief Electoral Officer Maharashtra Maharashtra DGIPRNagpur Municipal CorporationNagpur Police Commissionerate

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत