महाराष्ट्र ब्राह्मण सभेचा आ.डॉ.गुट्टेंना बिनशर्त पाठींबा
गंगाखेड (प्रतिनिधी):- बाळासाहेब जंगले
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ब्राह्मण सभा परभणी जिल्हा आणि पालम तालुका कार्यकारिणीच्या वतीने महायुती रासप पुरस्कृत उमेदवार डॉ.रत्नाकर गुट्टे यांना बिनशर्त पाठींबा दिला असून तसे पत्रच कार्यकारणी पदाधिकाऱ्यांनी सुपूर्द केले.
ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक असलेले परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यामध्ये आपण वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच आमच्या मागण्या शासन दरबारी मांडल्या. परिणामी, अनेक वर्षाच्या मागणीला यश आले असून नुकतेच परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले आहे. तसेच त्या महामंडळास भरीव आर्थिक तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण मोलाची भूमिका पार पाडली. त्याबद्दल सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने आम्ही हा पाठिंबा देत असल्याचे त्या पाठींबा पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शेकडो विकासकामांच्या माध्यमातून या मतदारसंघात पायाभूत सुविधा उपलब्ध करून विकासाला चालना दिली आहे. तसेच गेल्या ४० वर्षांचा ब्याकलॉग भरून काढला आहे. त्यामुळे आ.डॉ.गुट्टे यांची विकासकामे आणि कामाचा आवाका संपूर्ण मतदारसंघाला माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या या विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनता विकासाच्याच पाठीशी राहून आ.डॉ.गुट्टे यांनाच मोठ्या मताधिक्याने विजयी करेल, हाही विश्वास ब्राह्मण महासभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
आपल्या महायुती सरकारने राज्यातील ब्राह्मण समाज बांधवांसाठी खूप उल्लेखनीय निर्णय घेऊन अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व ब्राह्मण समाज समाज समाधानी आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून भविष्यात समाजाची आर्थिक उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे समाजाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
काही महिन्यांपूर्वी ब्राह्मण समाजाचे शिष्टमंडळ मला भेटले होते. त्यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी लावून धरणे संदर्भात विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी ही मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य सरकार पुढे ठेवली. त्यावर महायुती सरकारने सकारात्मक विचार करून हे आर्थिक विकास महामंडळ सुरू केले, याचा मला विशेष आनंद आहे. त्यामुळे माझ्या ब्राह्मण समाजाने दिलेला हा पाठिंबा माझ्या विजयात मोलाची भूमिका पार पाडेल, असा विश्वास आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्यासह महाराष्ट्र ब्राह्मण सभा जिल्हाध्यक्ष गौरव कुलकर्णी (धानोरकर), पालम तालुका संघटक किशन पत्की, प्रमोद इनामदार (सुपेकर) पालम तालुका अध्यक्ष तसेच राष्ट्रीय समाज पक्ष व मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ब्राह्मण समाज बांधव उपस्थित होते.

