बौद्ध अनुयायांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

चंद्रपूर जिल्हा
Share

बौद्ध अनुयायांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

 

चिमूर: जगातील सर्व बौद्धांचे मुख्य श्रद्धा केंद्र बिहार राज्यातील बौद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात नाही. त्यामुळे महाबोधी महाविहार १९४९ व्यवस्थापन कायदा रद्द करण्याच्या मागणीकरिता बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समन्वय समिती तालुका चिमूरतर्फे गुरुवारी (ता. २०) दुपारी १ वाजताच्या सुमारास संविधान चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात महाविहार आमचे, राज्य तुमचे नाही चालणार असा हजारो बौद्धांनी हुंकार भरला.

महाबोधी महाविहार बौद्धाच्या हवाली करावे, महाबोधी महाविहार १९४९ व्यवस्थापन कायदा तत्काळ रद्द करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौध्दांच्या हाती देण्यात यावे, या मागणीकरिता देश, विदेशात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्याकरिता भिक्खु संघ संघारामगिरी चिमूर, भारतीय बौध्द महासभा चिमूर, समता सैनिक दल चिमूर, बौध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समन्वय समिती तालुका चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्चा काढण्यात आला. भन्ते डॉ. धम्मचेती तथा भिक्खु संघाच्या नेतृत्वात संविधान चौक येथून मोर्चाला सुरवात करण्यात

आली.

राष्ट्रीय महामागनि मोर्चा छत्रपती संभाजी चौक, भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला.

तहसील कार्यालयापुढे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी आंदोलनाविषयी अॅड. भुपेश पाटील, नारायण कांबळे, समता दैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष वीरेंद्र बन्सोड, भन्ते डॉ. घम्मचेती यांनी विचार प्रकट केले. प्रास्ताविक समन्वय समिती अध्यक्ष विलास राऊत यांनी केले. संचालन प्रकाश मेश्राम यांनी, तर

आभार शुभम मंडपे यांनी मानले.

महाबोधी महाविहार १९४९ व्यवस्थापन कायदा हा असंवैधानिक असून, यामुळे बौद्धांच्या धार्मिक, समानतेच्या हक्ककाचे उलंघन होत आहे. तसेच अल्पसंख्याकांच्या अधिकारांना पायदळी तुडविण्यात येत आहे. त्यामुळे हा काळा कायदा तत्काळ रद्द करून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांना देण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार श्रीधर राजमाने यांचेमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, बिहारचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले. निवेदन देताना भन्ते डॉ. धम्मचेती यांच्यासह सर्व समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत