ई-मेलवरील तक्रारींकडे दुर्लक्ष: पाचपुते यांच्या तक्रारीची पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून दखल
🔹 कायद्यानुसार चौकशीचे आदेश, शिस्तभंगाची मागणी
अहमदनगर | प्रतिनिधी
जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य नागरिकांच्या कार्यालयीन ई-मेलद्वारे पाठवलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते दीपक पाचपुते यांनी पी.जी. पोर्टल वर सविस्तर तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सदर तक्रारीस DIV/HOMD/IGPNG/2025/137 हा टोकन क्रमांक देण्यात आला असून, ती २८ जून २०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाली आहे. अर्ज शाखेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित पोलिस उपविभागीय अधिकारी, पोलीस स्टेशन प्रमुख यांना याप्रकरणी अर्जाची प्रत पाठवून योग्य पातळीवर चौकशी करून कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
पाचपुते यांच्या म्हणण्यानुसार, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, पोलीस अधीक्षक कार्यालय व त्यांच्याअंतर्गत येणाऱ्या कार्यालयांकडे नागरिकांच्या ई-मेल तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्या तक्रारींची कोणतीही पोचही देण्यात येत नाही, चौकशी अहवाल सादर केला जात नाही, आणि नागरिकांच्या चौकशीस उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. यामुळे नागरिकांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय होत असून प्रशासनावरील विश्वास डळमळीत झाला आहे, अशी गंभीर टीका त्यांनी केली.
तक्रारीमध्ये “शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध नियम, २०१३” आणि “महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९” यांचा उल्लेख करत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
प्रशासनाने याबाबत तातडीने चौकशी करून दोषी अधिकारी/कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा पुढील कायदेशीर मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशाराही पाचपुते यांनी दिला आहे.

