राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्थेने (एनआयओएस) ऑक्टोबर 2026 च्या पहिल्या आठवड्यात सुरु होणाऱ्या, माध्यमिक आणि उच्च-माध्यमिक अभ्यासक्रमांसाठीच्या सार्वजनिक (थिअरी) परीक्षांच्या काळात परीक्षा केंद्रे म्हणून कार्य करण्यासाठी पात्र शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांकडून अर्ज मागवले आहेत.
एनआयओएस ऑक्टोबर 2026 प्रत्येक वर्षी दोनदा म्हणजेच एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात एनआयओएसच्या मुख्यालयाने अधिसूचित केलेल्या तारखांना सार्वजनिक परीक्षांचे आयोजन करत असते. यावर्षी म्हणजे ऑक्टोबर 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी, विहित निकषांच्या अधीन राहून, पीएमश्री विद्यालये, केंद्रीय विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालये, सरकारी तसेच सरकारी अनुदानित शाळा, खासगी शाळा, महाविद्यालये तसेच सीबीएसई, आयसीएसईशी संलग्न संस्था, राज्य शिक्षण मंडळे आणि महाविद्यालये या ठिकाणी परीक्षा केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
पात्र संस्थांचे प्राचार्य आणि प्रमुखांनी एनआयओएसच्या https://exams.nios.ac.in या संकेतस्थळावरील एनआयओएस परीक्षा केंद्र नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून आपापले अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. सदर पोर्टल दिनांक 23 जून 2026 ते 23 जुलै 2026 या कालावधीत नोंदणीसाठी खुले राहील. तपशीलवार पात्रता निकष, परीक्षा केंद्रासाठीचे नियम तसेच केंद्र स्वीकृती अर्ज आणि बँकेचे हमीपत्र यांचे विहित नमुने पोर्टलवर उपलब्ध आहेत.
सदर नोंदणीसाठी प्रथमच अर्ज करणाऱ्या संस्थांनी योग्य पद्धतीने भरलेले केंद्र स्वीकृती अर्ज आणि बँकेचे हमीपत्र ऑनलाईन पद्धतीने अपलोड करणे आणि सर्व प्रकारे पूर्ण केलेली मूळ कागदपत्रे ‘स्पीड पोस्ट’ने विनाविलंब पुण्यातील एनआयओएस प्रादेशिक केंद्राकडे पाठवून देणे आवश्यक आहे.
यापूर्वीच्या परीक्षांच्या वेळी एनआयओएसकडे आधीच नोंदणी केलेल्या संस्थांनी आता ऑक्टोबर 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी केवळ त्यांची संमती सादर करावी आणि आवश्यकता असल्यास त्यांच्या संस्थेचे तपशील अपलोड करावे.
ऑक्टोबर 2026 मधील सार्वजनिक परीक्षा सुरळीतपणे पार पाडाव्यात म्हणून सर्व पात्र संस्थांनी विहित कालमर्यादेच्या आत नोंदणी प्रकिया पूर्ण करावी असे आवाहन एनआयओएसतर्फे करण्यात आले आहे.

