शहरातील चौकाचौकात लावण्यात येणाऱ्या डिजिटल बॅनरवरील व्यक्तींच्या गळ्यातील सोन्याच्या मोठ्या चेन आता पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत. बॅनरवर गळ्यात भलीमोठी सोन्याची चेन घालून छायाचित्रे प्रसिद्ध करणाऱ्यांना बोलावून एवढे दागिने आले कोठून, याची चौकशी केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिला.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील अनेक चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर डिजिटल बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे मिरवणूक तसेच मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना अडथळा निर्माण झाला. एकाने डिजिटल बॅनर लावल्यानंतर दुसराही त्याच पद्धतीने बॅनर लावतो. ही स्पर्धा आता वाढत असून १५-१६ वर्षांची मुलेही बॅनर लावण्याचा विचार करू लागली आहेत, असे आयुक्तांनी बैठकीत नमूद केले.
विनापरवाना डिजिटल बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत देताना आयुक्तांनी मोठमोठे फलक लावण्याची गरज नसल्याचेही स्पष्ट केले. एखाद्या मंडळाने चांगले काम केले असेल, तर परिसरातील नागरिकांना ते काम माहीत असते. त्यासाठी मोठमोठे फलक लावण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी सांगितले.
उत्सवाच्या शुभेच्छांसाठी हात जोडून ‘आपले स्वागत आहे’, ‘उत्सवाच्या शुभेच्छा’ अशा आशयाचे बॅनर लावले जातात. मात्र, उत्सवासाठी आलेले नागरिक त्या बॅनरकडे पाहतही नाहीत. शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्या प्रत्यक्ष भेटून द्याव्यात, असेही आयुक्त एम. राजकुमार यांनी सांगितले.
महापालिकेच्या मदतीने विनापरवाना फलक काढण्यात येतील. मात्र, बॅनरवर गळ्यातील मोठमोठ्या सोन्याच्या चेन दाखविणाऱ्यांकडे पोलिसांचे लक्ष राहणार असून, त्यांच्या दागिन्यांबाबतही चौकशी केली जाईल, असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला.

