अत्याधुनिक ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’ चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले

E-Paper महाराष्ट्र
Share
अत्याधुनिक ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’ चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या सेंटरमुळे नागरिकांना पुनर्निर्माण प्रकल्पाचे आराखडे, त्यांच्या भविष्यातील घर, परिसर आणि कामाच्या ठिकाणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. त्यामुळे अफवा, गैरसमज आणि अपूर्ण माहितीला आळा बसून पुनर्विकासाबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास सेंटरची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला.
धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही; ती एक मोठे आर्थिक इंजिन आहे. येथे कुंभारवाड्यातील मातीभांडी उद्योग, चामड्याचा व्यवसाय, अन्नप्रक्रिया, प्लास्टिक पुनर्चक्रीकरण तसेच अन्य लघु-मध्यम उद्योगांमधून मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. या उद्योगांचा सन्मान राखत त्यांना अधिक चांगली आणि नियोजित कार्यस्थळे उपलब्ध करून देण्याचा विचार पुनर्विकास आराखड्यात करण्यात आला आहे. धारावीची विद्यमान सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक ओळख जपत तिचे सर्वंकष नागरी परिवर्तन करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात होत असलेल्या नागरी परिवर्तनाचे हे आदर्श उदाहरण आहे. धारावी पुनर्निर्माण प्रकल्प नेमका कसा असेल, आजची धारावी कशी आहे आणि भविष्यात तिचे स्वरूप कसे बदलणार आहे, याची ‘रिअल टाइम’ माहिती ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मध्ये सर्वांना मिळणार आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी प्रख्यात गायक शंकर महादेवन यांनी गायिलेल्या, ‘धारावी का कल’ या विशेष गीताचे लाँचिंग आणि ‘मेरे सपनों की धारावी’ या पुस्तकाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
यावेळी बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, धारावी पुनर्विकास प्रकल्प तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सचिव विपीन पालिवाल, धारावी पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी विशेष उद्देश कंपनी अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सरदाना, अदाणी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदानी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत