खडसंगी ग्रामपंचायतीतील क्रीडांगण प्रकरणाच्या चौकशीचा अंतिम अहवाल काय सांगणार?

जनतेच्या बाजूने निकाल लागणार की लोकप्रतिनिधींना क्लीनचिट? गावकऱ्यांचे लक्ष अंतिम अहवालाकडे

E-Paper चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र सामाजिक
Share

ग्रामपंचायत खडसंगीच्या कारभारासंदर्भात करण्यात आलेल्या विविध चौकशीच्या मागण्यांपैकी क्रीडांगण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून आता या चौकशीचा अंतिम अहवाल नेमका काय निष्कर्ष देतो, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. सदर अहवालातून वस्तुस्थिती समोर येऊन दोषींवर कारवाईची शिफारस होते की संबंधित लोकप्रतिनिधींना दिलासा मिळतो, हा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

चौकशी समितीसमोर उपस्थित राहण्याचे दोनदा आवाहन?

क्रीडांगण प्रकरणाच्या चौकशीसाठी गठित समितीच्या आदेशानुसार ग्रामपंचायत सचिवांनी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना पत्रव्यवहार करून चौकशी प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचे कळविले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दोन वेळा पत्रव्यवहार करूनही संबंधित पदाधिकारी चौकशीसमोर उपस्थित राहिले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

यामुळे “चौकशीसमोर उपस्थित राहण्यास टाळाटाळ का?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, संबंधितांची बाजू आणि अनुपस्थित राहण्याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट होणे आवश्यक आहे.

क्रीडांगणांची प्रत्यक्ष स्थिती काय?

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्रीडांगणांची प्रत्यक्ष उपलब्धता व त्यासंदर्भातील कागदपत्रे. उपलब्ध माहितीनुसार सहा क्रीडांगणे दाखविण्यात आल्याचा दावा केला जात असून प्रत्यक्ष पाहणीमध्ये त्यापैकी एक बास्केटबॉल मैदान अर्धवट स्वरूपात दिसत असल्याचे सांगण्यात येते. उर्वरित पाच क्रीडांगणे प्रत्यक्ष ठिकाणी कुठे आणि कोणत्या स्थितीत आहेत, याची स्पष्टता आवश्यक आहे.

त्यामुळे चौकशी समितीच्या अंतिम अहवालात प्रत्येक क्रीडांगणाचे ठिकाण, सीमांकन, प्रत्यक्ष कामाची स्थिती, मोजमाप आणि झालेला खर्च यांचा स्पष्ट उल्लेख होणार का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे.

सीमांकन उपलब्ध नसल्याचा दावा

क्रीडांगणांसाठी आवश्यक असलेले सीमांकन उपलब्ध आहे का? याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. जर सहा क्रीडांगणे दाखविण्यात आली असतील तर त्यांची निश्चित जागा, सीमांकन, मोजमाप आणि प्रत्यक्ष अस्तित्व याची पडताळणी करणे चौकशी समितीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

माहिती फलकावरही प्रश्नचिन्ह

क्रीडांगणाच्या कामाचा माहिती फलक उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यावर अंदाजे किंमत नमूद नसल्याचा आरोप आहे. तसेच फलकावर सहा क्रीडांगणांपैकी केवळ चार क्रीडांगणांची नावे दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

मग उर्वरित दोन क्रीडांगणांची नावे फलकावर का नमूद करण्यात आली नाहीत? त्यासाठी स्वतंत्र फलक आहे का? संबंधित कामांना स्वतंत्र प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी आहे का? याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

टेंडरपासून GST बिलापर्यंत सर्व कागदपत्रांची तपासणी होणार का?

या प्रकरणात केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष कामाची पडताळणी करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी समितीने खालील बाबी तपासाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे—

कामाचे Estimate व Technical Sanction, ग्रामपंचायत ठराव, प्रशासकीय मंजुरी व निधी मंजुरी, Tender / Work Order संबंधित कागदपत्रे, कामाचे Measurement Book (MB), प्रत्यक्ष झालेल्या कामाचे मोजमाप, GST Bills व इतर बिलिंग, साहित्य खरेदी व Stock Register, मटेरियल वापराची नोंद, देयके व PFMS/E-GramSwaraj नोंदी

काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र

क्रीडांगणांचे प्रत्यक्ष सीमांकन व स्थळ पाहणी अहवाल

तसेच बोगस बिल, बोगस सह्या किंवा कागदपत्रांमध्ये विसंगती असल्यास त्याची स्वतंत्रपणे पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

अंतिम अहवालात सत्य समोर येणार का?

ग्रामपंचायत खडसंगी संदर्भात दोन चौकशींची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी क्रीडांगण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर आता अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे हा अहवाल केवळ कागदोपत्री नोंदींवर आधारित राहणार की प्रत्यक्ष स्थळ पाहणी, मोजमाप आणि आर्थिक व्यवहारांची सखोल पडताळणी करून वस्तुस्थिती मांडणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

“चौकशी पारदर्शक झाली पाहिजे, प्रत्यक्ष काम आणि कागदपत्रे यांची सांगड घातली पाहिजे आणि दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

आता क्रीडांगण प्रकरणाच्या अंतिम चौकशी अहवालात सहा क्रीडांगणांची प्रत्यक्ष स्थिती, सीमांकन, खर्च, टेंडर, Estimate, ठराव, GST बिलिंग आणि साहित्य खरेदी याबाबत नेमके काय नमूद केले जाते, याकडे खडसंगी ग्रामस्थांसह सर्वांचे लक्ष लागले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत