ग्रामपंचायत खडसंगी येथे २ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामसभा घेण्यात आली नसल्याचा आरोप करत समस्त ग्रामस्थांनी पंचायत समिती, चिमूरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. ग्रामसभा ही ग्रामस्थांच्या सहभागाची आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजातील पारदर्शकतेची महत्त्वाची वैधानिक प्रक्रिया असताना ती झाली नसल्याचा आरोप झाल्याने आता प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, २ ऑक्टोबर रोजी ग्रामसभा घेण्यात आली नाही, त्यामुळे ग्रामस्थांना ग्रामसभेच्या माध्यमातून प्रश्न विचारण्याचा, माहिती घेण्याचा आणि विविध विषयांवर चर्चा करण्याचा अधिकार बजावता आला नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीत ग्रामसभा आयोजित करण्यासाठी नोटीस कायद्यानुसार काढण्यात आली होती का, ती ग्रामस्थांना नियमानुसार कळविण्यात आली होती का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामसभा न घेण्यास जबाबदार असलेल्या व्यक्ती अथवा अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सरपंचांकडून लेखी स्पष्टीकरणाची मागणी
तक्रारीमध्ये सरपंचांकडून ग्रामसभा न घेण्याबाबत लेखी स्पष्टीकरण घेण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. चौकशीत कर्तव्यात कसूर किंवा दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी पुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत ग्रामपंचायत खडसंगीची विशेष चौकशी करावी, तसेच चौकशीचे निष्कर्ष आणि करण्यात आलेल्या कारवाईची लेखी माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
“ग्रामसभा कागदावर नको, प्रत्यक्षात हवी!”
या प्रकरणामुळे खडसंगी गावात ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्रामसभा ही केवळ कागदोपत्री प्रक्रिया न राहता ग्रामस्थांसमोर प्रत्यक्ष आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे, अशी भूमिका तक्रारदार ग्रामस्थांनी मांडली आहे.
आता पंचायत समिती चिमूर आणि जिल्हा परिषद चंद्रपूर प्रशासन या तक्रारीची कितपत गांभीर्याने दखल घेते, चौकशी कोणाकडून केली जाते आणि दोष आढळल्यास काय कारवाई होते, याकडे खडसंगी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
“ग्रामसभेचा अधिकार अबाधित ठेवा, सत्य काय आहे ते चौकशीतून समोर आणा!” अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

