तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
सुनिल गेडाम तालुका प्रतिनिधी सिंदेवाही
चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये जवळपास 32 681 हेक्टर क्षेत्र हे तूर पिकाचे असून जिल्ह्यामधील एक प्रमुख पीक आहे. सध्या हे पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. परंतु बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिचांग चक्रीवादळाचा तडाका विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा जाणवत आहे. त्यामुळे सर्वत्र ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडून यामुळे तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीला पोषक वातावरण तयार झालेले आहे काही ठिकाणी या अळीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असून ही अळी अशावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी पिकाचे निरीक्षण करून शेंगा पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही चे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. व्ही. जी. नागदेवते व श्री. पराग सहारे, किटकशास्त्र विभाग यांनी केले आहे. शेंगा पोखरणारी हिरवी अळी (हेलिकोवर्पा)
तुर पिकांमध्ये शेंगा पोखरणारी हिरवी अळी/घाटे अळी ही भयंकर नुकसानकारक कीड आहे या किडीची मादी सरासरी 200 ते 500 अंडी तुरीच्या कोवळी पाने, देठ, कळ्या, फुले, तसेच शेंगावर वेगवेगळ्या ठिकाणी घालते. अंडीतून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीस सुस्त असून प्रथम कोवळी पाने व देठे कुरतडून खातात. नंतर शेंगांना अनियमित आकाराची छिद्रे पाडून आत शिरतात व दाणे खातात. डिसेंबर ते जानेवारी महिन्यात आभाळ आभ्राच्छदित असल्यास ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो.

पिसारी पतंग
या किडीची मादी कोवळी देठे, पाने, कळ्या, फुले व लहान शेंगावर रात्रीच्या वेळी वेगवेगळी अंडी घालते अंडी तून बाहेर पडलेली अळी शेंगेची साल खरडून तिला छिद्रे पाडते व बाहेर राहून आतील दाणे खाते.
शेंगमाशी
मादी शेंगांच्या सालीच्या आत अंडी घालते अंडीतून निघालेली अपाद अळी शेंगेत शिरून दाण्याचा पृष्ठभाग करतडून खाते त्यामुळे दाण्यावर नागमोडी खाचा तयार झालेल्या दिसतात. सुरुवातीला ह्या किडीच्या प्रादुर्भावाने शेंगेवर कोणतेही लक्षण दिसत नाही परंतु जेव्हा पूर्ण वाढलेली अळी कोषाअवस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते व त्या छिद्रातून माशी बाहेर पडते तेव्हा नुकसानीचा प्रकार आढळून येतो. असे एकात्मिक व्यवस्थापन करावे
या तिन्ही किडी, कळ्या, फुले व शेंगांवर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनासाठी जवळजवळ सारखेच उपाय योजावे लागतात.
यासाठी पूर्ण वाढ झालेल्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. हेक्टरी 20 पक्षी थांबे पिकामध्ये उभारावेत. अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून आल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील त्या गोळा करून नष्ट कराव्यात.
पहिली फवारणी
पिक 50 टक्के फुलोरा अवस्थेत असताना 5 टक्के निंबोळी अर्क किंवा अझॅडिरेक्टरीन 300 पीपीएम 50 मिलि किंवा अझॅडिरेक्टरीन 1500 पीपीएम 25 मिली किंवा एच.ए.एन पी.व्ही. (1×109) 500 रोगग्रस्त अळ्यांचा अर्क प्रतिहेक्टरी फवारावा किंवा क्विनॉलफॉस 25 इसी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
दुसरी फवारणी
पहिल्या फवारणी नंतर पंधरा दिवसांनी इथिऑन 50% इसी 20 मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 टक्के 10 मिली किंवा फ्लूबेंडामाईड ३९.३५ एससी 2 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 इसी 7 मिली किंवा इमामेक्टिन बेंजोएट 5 टक्के एसजी 4 ग्राम किंवा 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

