कलेच्या कौशल्यातून स्वतःची ओळख निर्माण करा
-माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे आवाहन
-रसायनशास्त्र विभागात वार्षिक स्नेहमिलन संमेलन
नागपूर : प्रत्येकामध्ये वेगळी अंगभूत कला असते. या कलेच्या कौशल्यातून स्वतःची ओळख निर्माण करण्याचे आवाहन माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी विद्यार्थ्यांना केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागात वार्षिक स्नेहमिलन सोहळ्याचे उद्घाटन बुधवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी पार पडले. या सोहळ्याचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. चौधरी बोलत होते.
रसायनशास्त्र विभागातील सभागृहात आयोजित उद्घाटन या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी भूषविले. यावेळी व्यासपीठावर रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एन. एन. यांना करडे, समन्वयक डॉ. आर. एस. डोंगरे, केमिकल सोसायटी अध्यक्ष चैतन्य गाडेकर, उपाध्यक्ष पृथा देवईकर उपस्थित होते. पुढे बोलताना कुलगुरू डॉ. चौधरी यांनी अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून तुमच्यातील विशिष्ट कौशल्य समोर येते असे सांगितले. विशेष कौशल्यामुळे आत्मविश्वास वाढत असून जीवनातील नैराश्य दूर करण्याचे काम देखील करते. स्वतःमधील चांगल्या सवयीला छंद म्हणून बाळगा, असे कुलगुरू म्हणाले. माहिती व ज्ञान अशा दोन प्रकारचे शिक्षण असते. आपण शिक्षणातून सर्व स्तरावरील ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्व स्तरातील ज्ञान तुम्हाला असेल तर पुढे जाण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही असे कुलगुरू म्हणाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना झालेल्या मित्रांना आपण कायम स्मरणात ठेवतो. शिवाय निस्वार्थ मैत्री याच काळात होते. मैत्रीचा धागा असाच कायम राहावा, असे कुलगुरू म्हणाले. वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाल्याचे त्यांनी घोषित केले.
स्वागतपर भाषणात डॉ. आर. एस. डोंगरे यांनी विभागातील विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक करताना विभाग प्रमुख डॉ. एन. एन. करडे यांनी विद्यार्थी सांस्कृतिक- क्रीडा कलागुणांचे सादरीकरण या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून करतात, असे सांगितले. भविष्यात या कलागुणांचा उपयोग होतो असे ते म्हणाले. कार्यक्रमाला विभागातील डॉ. ममता लांजेवार, डॉ. रवीन जुगादे, डॉ. विजय तांगडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
गायक वाटकर भगिनींचा सत्कार
स्नेहसंमेलन उद्घाटन कार्यक्रमात गायक धनश्री व भाग्यश्री वाटकर भगिनींचा कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धनश्री व भाग्यश्री या दोघीही विभागाच्या विद्यार्थिनी आहेत. यावेळी त्यांनी त्यांचे आवडते ‘हम कथा सुनाते’ हे गाणे सादर केले. या गाण्याला उपस्थित विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली.
#rtmnu #nagpur #nagpurnews #panchashil walke



