सामाजिक वनीकरण विभागाची १०० टक्के झाडे जिवंत
• पेंढरी येथील प्रकार
कालिदास खोब्रागडे, लाखनी :- अमृत महोत्सवी वर्षात पंचायतन वन तयार करण्याचे शासनाच्या निर्देशानुसार सामाजिक वनीकरण विभागाने पेंढरी, तालुका लाखनी येथे १ हेक्टर मध्ये लागवड केलेली १०१ झाडे जिवंत असून शेकडा प्रमाण १०० टक्के आहे. या कामी विभागीय वन अधिकारी एल. ए. आवारे, वन परिक्षेत्र अधिकारी विलास बेलखोडे यांचे मार्गदर्शनात वनपाल प्रमोदकुमार फुले यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
केंद्र शासनाचे वतीने ७५व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून २०२३ अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले. या करिता सामाजिक वनीकरण विभागास जिल्ह्यात २५ पंचायतन वन तयार करण्याचे निर्देश दिले. या पासून ग्रामीण भागातील स्थानिक नागरिकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहावे. या करिता पंचायतन वनाचे माध्यमातून देशी प्रजातीचे वृक्षांची लागवड करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सामाजिक वनीकरण विभागाचे वतीने पेंढरी, तालुका लाखनी येथील गट क्रमांक ८२९/१/२ आराजी १ हेक्टर मध्ये विभागीय वन अधिकारी एल. ए. आवारे, वन परिक्षेत्र अधिकारी विलास बेलखोडे यांचे मार्गदर्शनात वनपाल प्रमोदकुमार फुले यांचे सनियंत्रण व देखरेखीत १० बाय १० मीटर अंतरावर वड-१५, पिंपळ-१७, उंबर-२०, बेल-९, कडूलिंब-१०, देशी आंबा-३० इत्यादी प्रजातीच्या १०१ रोपांची लागवड करण्यात आली. सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचाऱ्यांकडून या रोपांची योग्य रीतीने निगा राखून आवश्यकतेनुसार फवारणी तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याने आजघडीस सर्वच्या सर्व १०१ झाडे जिवंत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

