कनिष्ठ अभियंत्यांची निम्न प्रतीचे बांधकामास मुकसंमती
प्रकरण – मग्रारोहयो तून कोलारी येथे सिमेंट काँक्रिट नाली बांधकामाचे
कालिदास खोब्रागडे, लाखनी :- तालुक्यातील कोलारी/पट स्थानिक स्वराज्य संस्थेचे वतीने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बंदीस्त गटारे(सिमेंट काँक्रिट नाली) बांधकामात अनेक प्रकारच्या अनियमितता वर्तमानपत्राने चव्हाट्यावर आणल्या असताना बांधकामाची चौकशी करण्याचे काम कनिष्ठ अभियंता महाकाळकर यांचेकडे असताना आठवडाभराचा कालावधी लोटून सुद्धा सिमेंट काँक्रिट नाली बांधकामास भेट दिली नसल्यामुळे निम्न प्रतीचे बांधकामास त्यांचीही मुकसंमती असल्याचे दिसून येते.
ग्रामीण परिसरात पायाभूत सुविधा निर्माण होऊन गावाचा विकास व्हावा व ग्रामस्थांना कसल्याही प्रकारची असुविधा होऊ नये. तसेच सांडपाणी व पावसाचे पाण्याची तत्काळ निकासी व्हावी. या करिता प्रमोद गाढवे ते केवळ हेमने यांचे घरापर्यंत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये बंदिस्त गटारे(सिमेंट काँक्रिट नाली) बांधकामास मंजुरी प्रदान करण्यात आली. तांत्रिक अधिकारी(कृषी) सुधाकर कांबळे यांचेकडे देखरेखीचे काम सोपविण्यात आले असले तरी बांधकाम योग्य रीतीने होते किंवा नाही. या बाबद सहनिशा करणे कनिष्ठ अभियंता महाकाळकर यांची जबाबदारी होती. सदर सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम करण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेने मजुरांची मागणी करणे आवश्यक होते. पण न करता पंचायत समिती प्रशासनाला अंधारात ठेऊन नाली बांधकाम सुरू करण्यात आले. अंदाजपत्रकात नमूद साहित्याच्या मात्रेचाही वापर केला नसल्याचे माहिती होताच वर्तमानपत्रातून अनेक बातम्या प्रकाशित झाल्या.
शासकीय योजनेतून होणारी विकास कामे दर्जेदार करण्याची जबाबदारी तांत्रिक अधिकाऱ्यासह कनिष्ठ अभियंता महाकाळकर यांची असली तरी वरची कमाई बंद होण्याचे भितीपोटी विकास कामांना भेट दिली जात नाही. तर मोजमाप पुस्तकांवर अर्थकारणाशिवाय स्वाक्षरी केली जात नसल्या च्या चर्चा होत आहेत. कोलारी/पट येथील सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम निम्न प्रतीचे होत असल्याचे अनेकदा वृत्त प्रकाशित होऊनही कनिष्ठ अभियंत्याने बांधकामास भेट देण्याचे सौजन्य दाखविले नाही. यावरून निकृष्ट बांधकामास कनिष्ठ अभियंत्याची मुकसंमती असल्याचे दिसून येते. गटविकास अधिकारी यांनी कोलारी येथील सिमेंट काँक्रिट नाली बांधकामाची चौकशी करून सत्यता जनतेपुढे आणणे आवश्यक झाले आहे.

