महापूर, दुष्काळ या संकटांवेळी मतदारसंघातील विरोधक नेमके कुठे होते?

आ.डॉ.गुट्टे : पेठशिवणी येथे निवडणूक प्रचार सभा

महाराष्ट्र
Share

महापूर, दुष्काळ या संकटांवेळी मतदारसंघातील विरोधक नेमके कुठे होते?

आ.डॉ.गुट्टे : पेठशिवणी येथे निवडणूक प्रचार सभा

गंगाखेड प्रतिनिधी
(बाळासाहेब जंगले)

निवडणुका आल्या की जनतेचा पुळका असल्याचे विरोधक दाखवून देत आहेत. त्यासाठी ते केवळ आरोप करीत आहेत. कारण, त्यांच्याकडे बोलण्याशिवाय दुसरे काहीही नाही. या मतदारसंघासाठी त्यांच्याकडे कोणतेच व्हिजन नाही. केवळ आरोप करायचे म्हणून ते सगळे बोलत आहेत. मात्र, आता निवडणुकीच्या काळात मते मागायला येणारी महाविकास आघाडी नेतेमंडळी मतदारसंघातील जनतेवर कोरोना, महापूर, दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशी संकटे आली त्यावेळी कुठे होती? असा प्रश्न उपस्थित करून त्यांच्या भूलथापांना थारा देऊ नका, असे आवाहन आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.

तालुक्यातील मौजे.पेठशिवणी येथे आयोजित जाहीर प्रचार सभेस सं​बोधित करताना ते बोलत होते. कोरोना आणि महापुराच्या काळात मी आपल्या मतदारसंघातील माणसांना आधार दिला. त्यांचे अश्रु पुसले, ही माझ्यासाठी समाधानाची गोष्ट असून पुढील काळात सुध्दा त्याच सामाजिक बांधिलकीने काम करीत राहीन, अशी ग्वाही सुध्दा आ.डॉ.गुट्टे यांनी दिली. तसेच आपल्या सर्वांचे प्रेम, विश्वास व पाठिंब्याच्या बळावर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. राहिलेली विकासकामे पूर्ण करून आपल्या मतदारसंघाला आणखी पुढे नेण्यासाठी अशीच भक्कम साथ द्या, अशीही विनंती उपस्थित जनसमुदायास केली.

पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, गंगाखेड विधानसभा हा माझ्यासाठी केवळ मतदारसंघ नसून माझे कुटुंब आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आजपर्यंत पाच हजार कोटींपेक्षाही अधिक निधी आणून कायापालाट केला आहे. अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. धोरणात्मक कामांना प्राधान्य देवून तेही सोडविले आहेत. म्हणून आपला माणूस म्हणून आपण सर्वांनी मला सदैव भरपूर प्रेम दिले आहे. त्यामुळे हीच आपुलकी व जिव्हाळ्याचे नाते कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्या.

प्रचार दौऱ्यात कितीही व्यस्त असलो तरी सर्वसामान्य जनता, युवक, युवती, जेष्ठ नागरिक, माता-भगिनी, नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते अतिशय आपुलकीने भेटतात. जिव्हाळ्याने बोलतात. कायम तुमच्या सोबत असल्याचा विश्वास देतात. तेव्हा या सर्वांसाठी थोडेफार काम केल्याचा आनंद आणि समाधान वाटते. तसेच ऊर्जा आणि बळ मिळते. कारण, माझी जनता हीच माझी ताकद आहे आणि कायम राहील सुद्धा, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी स्पष्ट केले.

आपल्या विधानसभा मतदारसंघाचा रखडलेला विकास आपण अगदी गतिमान करून कोट्यावधींची कामे केली आहेत. त्यामुळे आपली कामे आणि आपण वेळोवेळी केलेली मदत सुज्ञ माय-बाप जनता कधीही विसरणार नाही. कोरोनाच्या काळात तर आपण रात्र-रात्र जागे राहून जनसेवा केली आहे. त्यामुळे निवडणूक हंगामात पावसाळ्यातल्या छत्र्याप्रमाणे उगवणाऱ्या कोणत्याही लोकांना आम्ही बळी पडणार नाही. तसेच त्यांची फसवी आश्वासने त्यांनाच लखलाभ असोत, अशा शब्दात माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव रोकडे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष, मित्र मंडळासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट क्रमांक १

…म्हणून आपल्या विकासकामांमुळे विरोधकांना भरली धडकी

आपण केलेल्या विकासकामांचा विरोधकांनी धसका घेतला असल्याने विरोधक आपल्यावर नाहक आरोप करत आहेत. जवळपास ५ हजार कोटींपेक्षा जास्तीचा निधी आणून तालुक्याचा चौफेर विकास केला. विरोधकांना निवडणुकीत प्रचाराचा मुद्दाच उरला नाही. परिणामी आमच्यावर आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, या मतदारसंघातील विरोधकांची स्थिती सर्वांना ज्ञात आहे. आमच्या विरोधकांनी आजवर खोटं पण रेटून बोलायचे उद्योग केलेले आहेत. त्यामुळे यांना जनतेने पुरते ओळखले असून जनता त्यांना कधीही भुलणार नाही, अशा शब्दात आ.डॉ.गुट्टे यांनी विरोधकांना टोला लगावला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत