देवाची गोंधळलेली अर्ज पेटी!

महत्वाची बातमी महाराष्ट्र
Share

देवाची गोंधळलेली अर्ज पेटी!

 

स्वर्गात देव अर्ज वाचत बसले होते. पृथ्वीवरून रोज हजारो मागण्या येत होत्या.
कोणी म्हणत होते, “देवा,नोकरी लाव!”
कोणी म्हणत होते, “देवा,लग्न जुळव!”
तर महाराष्ट्रातून एक खास अर्ज आला.
“पेपर फुटले, आमदार फुटले, खासदार फुटले, आता ढग फुटू दे रे देवा!”
देव चक्रावले.
देव म्हणाले,”हे काय नवीन मागणं आहे?”
नारद मुनी म्हणाले, “प्रभो,पृथ्वीवर सध्या’फुटण्याचा सीझन’ चालू आहे.”
देवांनी पृथ्वीचा लाईव्ह टेलिकास्ट लावला.
पहिल्यांदा दिसले,परीक्षा सुरू होण्याआधीच पेपर फुटला!
देव म्हणाले,”अरेरे! विद्यार्थ्यांपेक्षा प्रश्नपत्रिकाच आधी बाहेर पडली!”
थोड्याच वेळात दुसरी बातमी आली आमदार फुटले!
एक पक्षाचे आमदार दुसऱ्या पक्षात उड्या मारत होते.
देव म्हणाले,”हे आमदार आहेत की पॉपकॉर्न?”
नारद म्हणाले, “प्रभो,अजून बघा.”
तेवढ्यात ब्रेकिंग न्यूज आली,
खासदार फुटले!
देवांनी कपाळावर हात मारला.
“ही लोकशाही आहे की फटाक्यांची माळ?”
तेवढ्यात अर्जातील शेवटची ओळ आठवली
“आता ढग फुटू दे रे देवा!”
देव म्हणाले,”नाही बाबा!बाकी सगळं फुटलं ते ठीक,पण ढग फुटले तर लोकांचीच पंचाईत होईल.”
मग देवांनी पृथ्वीवर संदेश पाठवला:
“पेपर फुटणं बंद करा, आमदार-खासदार फुटणं थांबवा, आणि ढगांना शांत बसू द्या.नाहीतर पुढच्या वेळी जनता फुटेल!”
हे ऐकून नारद हसत म्हणाले,
“प्रभो,जनता तर सोशल मीडियावर रोजच फुटत असते!”
आणि मग स्वर्गातही जोरदार हास्याचा पाऊस पडला… पण सुदैवाने ढग मात्र फुटले नाहीत!
रुपेश चवंडे..

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत