एरंडोलच्या धनश्री पाटीलची जागतिक झेप; आंतरराष्ट्रीय योग दिनी विश्वविक्रमात सहभाग, ‘रायझिंग इन्फ्लुएन्सर’ सन्मानाने गौरव

E-Paper आंतरराष्ट्रीय
Share

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने भारतीय योग परंपरेचा जागतिक स्तरावर गौरव वाढवणाऱ्या ऐतिहासिक विश्वविक्रमात एरंडोलच्या कन्येने उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. एरंडोलचे मूळ रहिवासी तथा सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले मनीष माधव पाटील यांची सुकन्या धनश्री मनीष पाटील हिने जागतिक विक्रमात यशस्वी सहभाग नोंदवत ‘इन्फ्लुएन्सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ तर्फे प्रदान करण्यात आलेले ‘रायझिंग इन्फ्लुएन्सर’ हे मानाचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.
१२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, दि. २१ जून २०२६ रोजी पुणे येथील माइंड अँड बॉडी योग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हा अनोखा जागतिक विक्रम साकारण्यात आला. या उपक्रमात २१ जोडप्यांनी अवघ्या २१ मिनिटांत २१ विविध योगासने अत्यंत अचूकता, समन्वय आणि शिस्तीने सादर करून विश्वविक्रमाची नोंद केली. या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार ठरत धनश्री पाटील यांनी उत्कृष्ट योगकौशल्य, आत्मविश्वास आणि समर्पणाचे दर्शन घडवले.
प्रख्यात योगतज्ज्ञ मनाली आमोद देव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सादरीकरणात सहभागींच्या लवचिकतेसह मानसिक एकाग्रता, सहनशक्ती, सांघिक समन्वय आणि भारतीय योगसंस्कृतीचे प्रभावी दर्शन घडले. सर्व तांत्रिक निकषांची पूर्तता झाल्यानंतर या विक्रमाची अधिकृत पुष्टी करण्यात आली, तदनंतर ‘इन्फ्लुएन्सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये या कामगिरीची अधिकृत नोंद करण्यात आली.
विशेष म्हणजे, ‘इन्फ्लुएन्सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ ही भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत नोंदणीकृत तसेच ISO प्रमाणित प्रतिष्ठित संस्थेच्या मुख्य संपादक महिमा जैन आणि जयेश भट्ट यांच्या स्वाक्षरीने हे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे.
धनश्री पाटील यांच्या या यशामुळे एरंडोलसह जळगाव जिल्ह्याच्या नावाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. आजच्या तरुण पिढीने योग, आरोग्य आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा स्वीकार केल्यास जागतिक स्तरावरही उल्लेखनीय यश संपादन करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण धनश्री यांनी घालून दिले आहे.
धनश्री यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. त्यांच्या या यशामुळे एरंडोलच्या युवा पिढीला नवी प्रेरणा मिळाली असून, “स्थानिक ते जागतिक” असा यशाचा प्रवास मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर शक्य असल्याचा सकारात्मक संदेश या कामगिरीतून मिळाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत