देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे वीर जवान शहीद राजेंद्र धनाजी ठाकरे यांच्या स्मृतींना एरंडोल नगरपरिषदेतर्फे भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. शहीद स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या अनुषंगाने एरंडोल येथील त्यांच्या गावातील पवित्र माती संकलित करण्यात आली. ही माती शहीद राजेंद्र धनाजी ठाकरे यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत संकलित करून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे पाठविण्यात आली आहे.
देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जपण्यासाठी राबविण्यात येत असलेला हा उपक्रम भावनिक आणि प्रेरणादायी ठरला. ज्या मातीत शहीद राजेंद्र धनाजी ठाकरे यांचे बालपण गेले, त्या मातीचा कण शहीद स्मारकाशी जोडला जाणार असून, त्यांच्या शौर्याची गाथा आणि त्यागाच्या स्मृती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास या उपक्रमातून हातभार लागणार आहे.
यावेळी शहीद राजेंद्र धनाजी ठाकरे यांच्या सर्वोच्च बलिदानाला नगरपरिषदेतर्फे अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागाला मानाचा मुजरा करण्यात आला.
सदर कार्य नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या उपक्रमासाठी कार्यालय अधीक्षक एस. आर. ठाकूर, आशिष परदेशी, विनोद जोशी व योगेश सपकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
‘शहीदांचे बलिदान कधीही विसरता कामा नये. त्यांच्या शौर्याची आणि त्यागाची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे,’ अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
