*🔹 भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- पोस्ट १२९.*🔹
*🔹७. प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती.*🔹◾भाग -४◾
◾ फार बोलतो एवढ्यावरून कोणी धम्माचा आधारस्तंभ ठरत नाही. जरी माणसाचे ज्ञान अल्प असले तरी तो धम्माला साक्षात पाहतो, जो धम्माची कधीही हेळसांड करीत नाही तोच धम्माचा आधारस्तंभ असतो.
◾ माणसाला दूरदर्शी, शहाणा, संयमी सहचारी भेटला तर त्याने त्याचा सहवास करावा. त्याच्याबरोबर आल्या संकटावर मात करावी, आनंदाने परंतु विचारीपणाने त्याची संगत धरावी.
◾जर माणसाला दूरदृष्टीचा, शहाणा, संयमी सोबती लाभला नाही तर त्याने जसा एखादा राजा जिंकलेला प्रदेश मागे सोडून वनराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो,त्याप्रमाणे त्याने आपला जीवनपथ एकट्यानेच आक्रमावा.
◾ एकांत पत्करला, परंतु मूर्खांची संगत नको. पाप करू नये आणि अगदी थोडक्यात इच्छा ठेवून वनराजाप्रमाणे एकटेच आपला जीवनपथ आक्रमित रहावे.
◾ प्रसंग पडेल तर मित्र सुखदायक आहे. काही कारण काही असले तरी भोगसामग्री सुखदायक आहे. कारण काही असले तरी सत्कर्म हे कुशल सुखदायक आहे.मरणाची घडी जवळ आली असताना सत्कर्म सुखदायक आहे. दुःखाचा त्याग सुखदायक आहे.
◾ जगात मातेची अवस्था सुखकर आहे. पित्याची अवस्था सुखकर आहे. श्रमणाची अवस्था सुखकर आहे.
◾ वार्धक्यातही टिकणारा सद्गुण सुखदायक आहे. खोलवर मुळे जाऊन दृढ झालेली श्रद्धा सुखकर आहे. ज्ञानार्जन सुखदायक आहे. पापत्याग सुखदायक आहे.
◾ मूर्खांचा सहवास दीर्घकाल दुःख देतो, शत्रूच्या सोबतीप्रमाणे मुर्खाची सोबत दुःखदायक आहे. आप्तेष्टांच्या भेटीप्रमाणे सत्संगतीही सुखकारक आहे.
◾ म्हणून माणसाने शहाण्या, बुद्धिमान, पंडित, क्षमाशील, कर्तव्यदक्ष श्रेष्ठींच्या मार्गाने जावे. ज्याप्रमाणे चंद्र नक्षत्रांच्या मार्गाने जातो त्याप्रमाणे अशा प्रज्ञावान सुजनांचे अनुयायी व्हावे.
◾ डामडौल, प्रीती आणि असक्ती ह्यांच्या उपभोगांची कास धरू नका, ज्याच्या ठिकाणी कळकळ आहे त्याच्या वाट्याला पुरेसा आनंद येतो.
◾ आंतरिक तळमळीने पंडित जेव्हा अंगच्या गर्वाचे निरास करतो तेव्हा तो शहाणपणाच्या एकाहून एक उंच अशा शिखरांवर चढून मूर्खाकडे तुच्छतेने पाहत असतो. दुःखापासून विमुक्त झालेल्या माणसांना पाहत असतो.त्याप्रमाणेच दुःखात मग्न असलेल्या जनसंमर्दाकडे दृष्टिक्षेप करीत असतो.
◾ अविचारी माणसात विवेकशील, निद्रिस्तात जागृत असा तो शहाणा मनुष्य दुबळ्यांना मागे सारून पुढे सरत असतो.
*🔹( संदर्भ- भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक- डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पान नं.२७९ .)*🔹
*🔹 संकलन- आयु.प्रशांत चव्हाण सर.*🔹

