संशोधनासाठी उपलब्ध होणार जनगणनेची माहिती
-जनगणना संचलन संचालनालयाचा विद्यापीठासोबत सामंजस्य करार
नागपूर : विद्यार्थी, शिक्षकांना संशोधनासाठी जनगणनेची माहिती आता उपलब्ध होणार आहे. याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने जनगणना संचलन संचालनालय यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. सामंजस्य करार हस्तांतरण सोहळा विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभा कक्षात मंगळवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी पार पडला. माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि जनगणना संचलन संचालनालयाच्या संचालक डॉ. निरुपमा डांगे यांनी सामंजस्य करार हस्तांतरित केला.
सभा कक्षात झालेल्या कार्यक्रमाला माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, जनगणना संचलन संचालनालय मुंबईच्या संचालक डॉ. निरुपमा डांगे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. संजय कवीश्वर, मानव्य विज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळ संचालक डॉ. राजेश सिंह, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास जांभुळकर, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक बोरकर, डॉ. सत्यप्रिय इंदूरवाडे, जनगणना संचलन संचालनालय मुंबई कार्यालयातील डेप्युटी रजिस्टर जनरल श्री. ए.एन. राजू, सहसंचालक (आयटी) व्ही. एक. अहिरे, सहसंचालक वाय. एस. पाटील, उपसंचालक किरण गुरव, सहाय्यक संचालक (आयटी) प्रवीण भगत यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळ संचालक डॉ. राजेश सिंह यांनी या सामंजस्य कराराबाबत माहिती दिली. सोबतच जनगणना संचलन संचालनालय मुंबई येथील उपस्थित प्रतिनिधींचे त्यांनी विद्यापीठाच्या वतीने स्वागत केले. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी जनगणना संबंधी संशोधन करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांना विद्यापीठातील जनगणना डेटा संशोधन कार्य केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. जनगणना संचलन संचालनालयाचे डेप्युटी रजिस्टर जनरल श्री. ए.एन. राजू यांनी सभा कक्षात पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे जनगणना त्याचप्रमाणे विद्यापीठात स्थापित करण्यात आलेल्या जनगणना डेटा संशोधन कार्यकेंद्र या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या माहिती बाबत सादरीकरण केले. भारतामध्ये १८७२ पासून जनगणनेस प्रारंभ झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. १८८१ पासून प्रत्येक १० वर्षानंतर जनगणना केली जात आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत असून भारत सरकारकडून जनगणनेचे कार्य केल्या जाते. जनगणनेसंबंधी १९४८ मधील कायद्याचे कलम १५ नुसार वैयक्तिक माहिती उघड करता येत नसल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या केंद्राच्या मदतीने जनगणनेबाबत संशोधनास वाव मिळणार आहे. यावेळी उपस्थित त्यांचे आभार डॉ. सत्यप्रिय इंदुरवाडे यांनी मानले.
जनगणना डेटा संशोधन कार्यकेंद्र उद्घाटित
विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील सांख्यिकी विभागात जनगणना डेटा संशोधन कार्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन माननीय प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे व जनगणना संचलन संचालनालयाच्या संचालक डॉ. निरुपमा डांगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.



