नवनवीन रूपात येतोय इतिहास – डॉ. राजा दीक्षित
-इतिहास परिषदेच्या ५६ वे अधिवेशनास सुरुवात
नागपूर : आभासी इतिहास, नवखा इतिहास, फुरसती इतिहास, छंदिष्ट इतिहास, अशा नवनवीन रूपात इतिहास येत असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. राजा दीक्षित यांनी बीजभाषण करताना केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन येथे आयोजित इतिहास परिषदेचे ५६ वे अधिवेशनाचे उद्घाटन कार्यक्रमात डॉ. दीक्षित बीजभाषण करताना शुक्रवार, दिनांक १ मार्च २०२४ रोजी बोलत होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या इतिहास परिषदेचे आयोजन विद्यापीठाचा पदव्युत्तर इतिहास विभाग, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभाग आणि प्रवास व पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या इतिहास परिषदेच्या उद्घाटन समारंभाला अध्यक्षस्थानी माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे, प्रमुख अतिथी म्हणून मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे मानद सचिव श्री. संदीप जोशी, बीजभाषक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. राजा दीक्षित, विशेष अतिथी म्हणून इतिहास भाष्यकार व वरिष्ठ तांत्रिक अधिकारी पोलीस विभाग श्री. प्रवीण योगी, जिजामाता महाविद्यालय बुलढाणा येथील प्राचार्य तथा परिषदेचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. प्रशांत कोठे, गोंडवाना विद्यापीठाचे इतिहास मंडळ अध्यक्ष डॉ. प्रकाश शेंडे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ इतिहास मंडळाचे अध्यक्ष डॉ. नामदेव ढाले, स्वागताध्यक्ष अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, परिषद सचिव डॉ. रवींद्र लोणारे, स्थानिक सचिव डॉ. रामभाऊ कोरेकर यांची उपस्थिती होती.
विषयाची स्थिती, तत्त्वज्ञान स्थिती, व्याप-विस्तार, संकल्पनेत होणारे बदल यावर चर्चा करण्याकरिता परिषद भरवतो. सद्यस्थितीत सामाजिक शास्त्र विषयातील ज्ञानात बदल होत आहे इतिहासाला देखील भाषाशास्त्रीय, भौतिकशास्त्रीय वळण आले आहे संकल्पना बदलत आहे. त्यामुळे इतिहास म्हणजे काय ?याचे विचारमंथन सुरू असल्याचे बीजभाषण करताना डॉ. राजा दीक्षित यांनी सांगितले. इतिहास हे महाकथन असून यात चार घटक मांडले जातात. हिस्ट्री अँड डिसीज हा इतिहासात नवीन कलाटणी देणारा विषय आहे. कोरोनापूर्वी आणि कोरोना नंतर इतिहासाची मांडणी वेगळी येईल असे ते म्हणाले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम विद्याशाखेस त्यांनी नवीन निर्मिती म्हणजेच इतिहासातील नवीन बंडखोरी असल्याचे म्हटले आहे. जगात इतिहासाबाबत मंथन होत असून अनेक समांतर प्रवाह आहे. अमेरिका, दक्षिण आफ्रिका, भारत तसेच महाराष्ट्रातील प्रवाहांची त्यांनी माहिती दिली.
नवीन पिढीला प्रेरणा मिळेल – डॉ. प्रशान्त बोकारे
इतिहासातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांनी अध्यक्षीय भाषण करताना केले. इतिहास विषयी परिषद होणे काळाची गरज आहे. जेत्यांनी लिहिलेला इतिहास त्यांच्या पराक्रमाला कितपत न्याय असतो हा संशोधनाचा विषय आहे. सिकंदर आणि पोरस यांच्या लढाईचे उदाहरण त्यांनी दिले. पोरस पराभूत असला तरी त्याला काय संघर्ष करावा लागला ते देखील महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टींचा विचार करीत खरा इतिहास समोर आणणे समाजासाठी प्रेरणादायी ठरेल. पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला असाच इतिहास आपणास शिकवला. मात्र, महादजी शिंदे यांनी दिल्लीत काय पराक्रम केला याचा इतिहास समोर आला नाही. पराभव असो वा जिंकणे यातून काहीतरी प्रेरणा मिळेल. या आव्हानाला सामोरे जात या परिषदेत ॲक्शन प्लॅन निश्चित करण्याचे आवाहन डॉ. बोकारे यांनी केले.
उद्घाटन समारंभात इतिहास परिषदेच्या अधिवेशनाची भूमिका विद्यापीठाचे मानवशास्त्र विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी मांडली. दोन दिवसीय अधिवेशनाच्या कार्यक्रमाची रूपरेखा त्यांनी सांगितले. विद्यापीठामध्ये तिसऱ्यांदा इतिहास परिषदेचे अधिवेशन होत असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक करताना परिषदेचे सचिव डॉ. रवींद्र लोणारे यांनी परिषदेच्या आयोजन बाबत तसेच अतिथींबाबत माहिती दिली. तत्पूर्वी भारतीय पुरातत्व विभाग आणि विद्यापीठाच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनीचे उद्घाटन प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे व अतिथींच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. उद्घाटन समारंभाचे संचालन स्थानिक सचिव डॉ. रामभाऊ कोरेकर यांनी केले तर आभार डॉ. सचिन भोगेकर यांनी मानले.

