अबब… रोपवन मजूर हजेरी पत्रकावर वन रक्षकाचे नाव…!
किन्ही रोपवनातील प्रकार, ५ हजार ७९० रुपयाची केली उचल
कालिदास खोब्रागडे, लाखनी :- कोणत्याही शासकीय योजनेच्या विकास कामावर कार्यरत मजुरांच्या मजुरीची रक्कम त्यांचे बँक खात्यात जमा करण्याचे शासनाचे निर्देश असले तरी काही स्वार्थी लोकसेवकांकडून मजूर हजेरी पत्रकात आपले नाव नमूद करून मजुरीची उचल केल्याचा अफलातून प्रकार वन परिक्षेत्र लाखनी, सहवनक्षेत्र उमरझरी चे अधिनस्त वनरक्षक बीट चांदोरी मधील किन्ही रोपवनात आला. येथील वन रक्षकाने २२/०८/२०२३ चे मजुर हजेरी पत्रकात अनुक्रमांक १३ वर स्वतःचे नाव लिहून सोयगाव जिल्हा सांगली येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे खात्यातून ५ हजार ७९० रुपयाची उचल केल्याचे वास्तव समोर आल्याने वन विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असला तरी या वनरक्षकावर काय कारवाई केली जाते. याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
अवैध वृक्षतोडीमुळे वनक्षेत्र नामशेष होण्याचे मार्गावर असल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचे मार्गावर आहे. या प्रकाराने अतिवृष्टी, केव्हा केव्हा अवर्षण तर ग्लोबल वॉर्मिग सारख्या समस्यांना मानवाला सामोरे जावे लागत आहे. वनक्षेत्रात वाढ करण्यासाठी वन विभागाचे अखत्यारीत असलेल्या पडीक जागेवर वृक्ष लागवड करून वनक्षेत्र वाढीसाठी शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. वन परिक्षेत्र अधिकारी लाखनी चे अधिनस्त सहवनक्षेत्र उमरझरी अंतर्गत असलेल्या वनरक्षक बीट चांदोरी मधील किन्ही येथील झुडपी जंगल गट क्रमांक ४५०, ४५१ मधील १५ हेक्टर जागेत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये राज्य योजना वनिकरणाचा भरगच्च कार्यक्रम अंतर्गत मिश्र रोपवन लागवडीस मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यात १६ हजार ६६५ रोपे वन परिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले, प्रभारी क्षेत्र सहाय्यक राकेश कोदाने यांचे मार्गदर्शनात चांदोरी बीटाचे वनरक्षक नितीन उशीर यांचे देखरेख व सनियंत्रणात मिश्र रोपवन लागवड करण्यात आली. त्यात सागवान, आवळा, जांभूळ, आजन, चिंच, बेल, निंब, मोहा, बोर, आंबा इत्यादी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
किन्ही मिश्र रोपवनातील रोपांची निगा राखण्यासाठी किन्ही येथे वन व्यवस्थापन समिती असताना चांदोरी च्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती मार्फत काही मजूर ठेवण्यात आले होते. त्या मजुरांची मजुरी आरटीजीएस व्दारे जमा करण्याबाबद संयुक्त वन व्यवस्थापन समिती चांदोरी चे पत्र क्रमांक २०८ दिनांक २२/८/२०२३ रोजी शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक साकोली यांना पत्र लिहून खाता क्रमांक १/५४८/२२७८६ या खात्यामधून किन्ही रोपवनात कार्यरत मजुरांच्या खात्यात आरटीजीएस व्दारे रक्कम वितरित करण्यासाठी अध्यक्ष, सचिव संयुक्त वन व्यवस्थापन समिती चांदोरी मार्फत १ लाख १६ हजार २८१ रुपयाचे धनादेश क्रमांक २३३०३७ दिनांक २२/८/२०२३ रोजी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा साकोली कडे पाठविण्यात आले होते. त्या मजुरांचे यादीत अनुक्रमांक १३ वर चांदोरी बीटाचे वनरक्षक एन.बी. उशीर यांचे नाव असून त्यांचे भारतीय स्टेट बँक सोयगाव, जिल्हा सांगली
येथील खाता क्रमांक ३१००६७९५३४२ यावर ५ हजार ७९० रुपये पाठविण्यात आले असल्याचे उघडकीस आल्याने मजूर हजेरी पत्रकावर वनरक्षकाचे नाव अशा खमंग चर्चांना पेव फुटले आहे.
*वन अधिकाऱ्याचा वन रक्षकास वरदहस्त(चौकट)*
वन क्षेत्रालगत १ हजार लोकसंख्येच्या गावात वन व्यवस्थापन समिती व १ हजार च्या वर लोकसंख्या असलेल्या गावात संयुक्त वन व्यवस्थापन समिती ची वन विभागामार्फत स्थापना करण्यात आली आहे. यात वन व्यवस्थापन समिती सचिव पदी वनरक्षक तर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सचिव पदी क्षेत्र सहाय्यक असतो. किन्ही रोपवन मजूर यादीत वनरक्षकाचे नाव असताना संयुक्त वन व्यवस्थापन समिती चांदोरी सचिव म्हणजेच तत्कालीन प्रभारी क्षेत्र साहाय्यक राकेश कोदाने यांनी या गैरप्रकारास मूकसंमती दिल्याने वन अधिकाऱ्याचा वन रक्षकास वरदहस्त असल्याचे दिसून येते.
*सहाय्यक वन संरक्षकाकडून चौकशीस टाळाटाळ(चौकट)*
वन परिक्षेत्र अधिकारी लाखनी चे अधिनस्त किन्ही व सोनपुरी येथे राज्य योजना वनिकरणाचा भरगच्च कार्यक्रमा अंतर्गत २०२२-२३ मध्ये मिश्र रोपवन लागवड करण्यात आली होती. त्यात अनेक प्रकारच्या अनियमितता व शासकीय निधीची अफरातफर करण्यात आल्याची सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सहाय्यक वन संरक्षक साकोली यांचेकडे तक्रार केली होती. यास अडीच महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा कारवाईचे सौजन्य दाखविले गेले नसल्यामुळे सहाय्यक वन संरक्षकाकडून चौकशीस टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येते.

