भरधाव मोटारसायकलचे धडकेत पादचारी ठार • मासलमेटा येथील घटना, लाखनी पोलिसांत गुन्हा दाखल

महाराष्ट्र
Share

भरधाव मोटारसायकलचे धडकेत पादचारी ठार
• मासलमेटा येथील घटना, लाखनी पोलिसांत गुन्हा दाखल

 

कालिदास खोब्रागडे, लाखनी :- बैलांचा इनामी शंकरपट पाहून स्वगावी पायी जात असताना भरधाव वेगाने मागेहून येणाऱ्या मोटारसायकल चालकाने हयगयीने व निष्काळजीपणे दुचाकी चालवून मासलमेटा बसस्थानकासमोरील डांबर रस्त्यावर पादचाऱ्यास मागेहून जबर धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी(ता.१) रोजी उघडकीस आली. मृतकाचे नाव सुभाष केशव गोंधुळे(४५) रा. लाखोरी, तालुका लाखनी असे आहे. अपघातानंतर दुचाकी चालक पसार झाला. लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
सालेभाटा येथे बैलांच्या जंगी इनामी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. शंकरपट पाहून सुभाष गोंधुळे स्वगावी लाखोरी कडे पायदळ जात असताना मासलमेटा बसस्थानकाजवळ मागेहून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच ३५ जे ३२१२ चे चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे दुचाकी चालवून त्याला धडक दिल्याने तो रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती होताच घटनास्थळावर लोकांचा जमाव जमला होता. मृतकाचा पुतण्या पितांबर गोंधुळे दुपारचे सुमारास पट समितीस आयजल चा पाणी पुरवठा करण्यास स्वतः च्या मारुती व्हॅन ने गेला असता त्याला मृतक शंकरपटात मिळाला होता. पाण्याचे खाली कॅन आणण्यासाठी रात्री परत जात असताना मासलमेटा येथे रात्री ८:०० वाजता दरम्यान बसस्थानकासमोरील डांबरी रस्त्यावर लोकांची गर्दी जमलेली दिसली. त्यामुळे मारुती व्हॅन बाजूला ठेऊन जखमी इसमाची मोबाईलच्या टॉर्चने पाहणी केली असता त्याचा काका जखमी अवस्थेत पडलेला दिसून आला. त्याच्या नाका तोंडातून रक्तस्त्राव व डोक्याला मुका मार लागलेला असल्याचे दिसून आले. तसेच बाजूला मोडतोड झालेल्या अवस्थेत दुचाकी पडून दिसल्याने जखमी चा मुलगा हर्षल याला घटनेची माहिती दिली. तो घटनास्थळी येताच हर्षल आणि पितांबर यांनी जखमीस भंडारा येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी भरती केले. पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकी चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. मृतकाचा पुतण्या पितांबर गोंधुळे यांचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक १७६/२०२४ कलम २७९, ३०४(अ) भादवि तथा मोटारवाहन कायदा सहकलम १८४, १३४(ब) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अशोक बोडे तपास करीत आहेत. वृत्त लिही पर्यंत मोटारसायकल चालकाचा शोध लागला नव्हता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत