भूगाव रेती घाटातील वाळू माफियांना आले सुगीचे दिवस.  पालांदूर सहाय्यक पोलीस निरीक्षक मेहेरबान

महाराष्ट्र
Share

भूगाव रेती घाटातील वाळू माफियांना आले सुगीचे दिवस

 पालांदूर सहाय्यक पोलीस निरीक्षक मेहेरबान

कालिदास खोब्रागडे, लाखनी :- पालांदूर पोलिस ठाण्याचे हद्दीतून प्रवाहित होणाऱ्या चुलबंद नदी पात्रातील भूगाव रेती घाटातून अवैध रेती उपसा व ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या न्याहारवानी, पालांदूर, पहाडी, कवडसी येथील रेती तस्करांशी सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या अर्थपूर्ण संबंधामुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर पालांदूर ठाणेदारासह खनिकर्म, महसूल व स्थानिक गुन्हे शाखेकडून कसलीही कारवाई होत नसल्यामुळे भूगाव रेती घाटात अवैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांना सुगीचे दिवस आल्याच्या भूगाव परिसरात चर्चा होत आहेत.
सूर्यास्तापासून सूर्योदयापूर्वी नदी घाटातून रेतीचा उपसा करून नये. असे शासनाचे सक्त निर्देश असले तरी यास तिलांजली देऊन पोलिस, खनिकर्म, महसूल व स्थानिक गुन्हे शाखेचे आशीर्वादाने रेती माफिये मध्यरात्री पासून सकाळ पर्यंत बिनबोभाट रेतीचा उपसा करीत असल्याचे चुलबंद नदी पात्रातील भूगाव रेती घाटातून वास्तव समोर आले आहे. सदर रेती घाट मुरमाडी/तूप. महसूल मंडळाचे अधिनस्त असून पालांदूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आहे. येथील ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पाथरी, मरेगाव आणि पालांदूर परिसरात अवैध ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई केली असली तरी भूगाव रेती घाटातून अवैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्या न्याहारवानी, पालांदूर, पहाडी व कवळसी येथील वाळू तस्करांवर कारवाई चे सौजन्य मागील महिना भरापासून दाखविले नसल्यामुळे पाणी कुठं मुरते ? हे न समजण्या पलीकडील आहे.
चुलबंद नदी घाटातील सर्वच रेती घाट रेती डेपोला संलग्न करण्याचे सौजन्य दाखविले गेले असले तरी भूगाव रेती घाट खुला ठेवण्याचे प्रयोजन काय ? असा प्रश्न निर्माण होत असून गौण खनिज संरक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस, खनिकर्म व महसूल विभागाची असताना भूगाव रेती घाटातून वाळू माफियांना अवैध रेती उपसा व वाहतुकीची खुली सूट कोणी आणि कशी दिली आहे ? हा संशोधनाचा विषय आहे. भूगाव रेती घाटातून पिंपळगाव/सडक कडे रेती वाहतूक होत असताना मुरमाडी/तूप., शिवणी, पिंपळगाव येथे मुख्य रस्त्यावरच तलाठी कार्यालय असताना रेती चोरीवर आळा घालण्याचे सौजन्य का दाखविले जात नाही ? भूगाव रेती घाटातून झरप, कोलारी, घोडेझरी, गुरढा, पोहरा मार्गे रेती वाहतूक होत असताना कोलारी, गुरढा, पेंढरी व पोहरा येथे तलाठी कार्यालय असताना रेती चोरीवर आळा का घातला जात नाही ? या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेही नाही. यावरून अर्थकारण करा आणि नैसर्गिक संसाधनांचे दोहन करा. असाच प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. अवैध रेती चोरीवर प्रतिबंध लावण्याकरीत महसूल विभागाचे फिरते पथक, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याची पेट्रोलिंग या शिवाय साकोली उपविभागातील समाविष्ट असलेल्या ठाण्यातील ठाणेदाराचे नेतृत्वात दररोज पेट्रोलिंग या शिवाय स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचीही पेट्रोलिंग असताना भूगाव रेती घाटातून अवैध रेती उपसा व ओव्हरलोड वाहतूक करणारे विना क्रमांकाचे दररोज चालणारे २५ ते २७ रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्याचे सौजन्य का दाखविले जात नाही. हे एक कोडेच आहे.
भूगाव रेती घाटातून अवैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांचे नेतृत्व न्याहारवानी येथील एक वाळू माफिया करीत असून त्याचे मार्फत पोलिस, खनिकर्म, महसूल व स्थानिक गुन्हे शाखा विभागातील संबंधितांना ठराविक दिवशी ठरलेली रक्कम पोहचती केली जात असल्यामुळे वरची कमाई बंद होण्याचे भीतीपोटी भूगाव रेती घाटातून रेती उपसा व वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांना खुली सुट दिली जात आहे. त्यामुळे “रक्षकच भक्षक” बनण्याचे मार्गावर असल्याचा प्रत्यय येतो. वरिष्ठ पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन अवैध गौण खनिजाची होणारी लूट थांबवावी किंवा भूगाव रेती घाट लगतच्या रेती डेपोला जोडण्याची कार्यवाही करावी. जेणे करून शासनास महसूल उपलब्ध होईल. न केल्यास वाळू माफियांना रेती तस्करी करून सुगीचे दिवस येणार यात तिळमात्र शंका नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत