तेंदूपत्ता संकलनास गेलेला मजुर अस्वलाचे हल्ल्यात गंभीर मुर्झा/पारडी येथील घटना, रुग्णालयात उपचार सुरू

महाराष्ट्र
Share

तेंदूपत्ता संकलनास गेलेला मजुर अस्वलाचे हल्ल्यात गंभीर

मुर्झा/पारडी येथील घटना, रुग्णालयात उपचार सुरू

कालिदास खोब्रागडे, लाखनी :- तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी वनक्षेत्रात गेलेल्या मजुरावर अचानक अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवार(ता.४) सकाळी ८:०० वाजताचे सुमारास उघडकीस आली. गंभीर जखमी मजुराचे नाव रमेश हगरू आंबेडारे(५५) रा. मुर्झा/पारडी, तालुका लाखांदूर असे आहे. त्याचेवर ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे उपचार सुरू असून वन अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली आहे. या घटनेने मजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू असून उत्तम दर व बोनसची सोय असल्यामुळे ग्रामीण परिसरातील शेकडो मजूर तेंदूपत्ता संकलनाचे कामात गुंतलेले आहेत. वन परिक्षेत्र लाखांदूर अंतर्गत सहवनक्षेत्र दिघोरी/मोठी आणि अर्जुनी/मोर वन परिक्षेत्राच्या सीमावर्ती भागात मुर्झा/पारडी येथील काही मजूर सकाळचे सुमारास तेंदूपत्ता संकलन करीत असताना अचानक अस्वलाने हल्ला केल्याने रमेश आंबेडारे गंभीर जखमी झाला. ही बाब सहकारी मजुरांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी आरडाओरड केल्यामुळे अस्वल जंगलात पळून गेले. सहकारी मजुरांनी जखमीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात भरती करून वन परिक्षेत्र अधिकारी लाखांदूर यांना घटनेची माहिती देण्यात आली. कर्तव्यावरील वैद्यकिय अधिकारी यांनी उपचार केले. वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित, क्षेत्र सहाय्यक सय्यद, वनरक्षक खंडागळे यांचेसह वन कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली. तेंदूपत्ता संकलनाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने मजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी एकट्याने पहाटे किंवा सकाळचे सुमारास वनक्षेत्रात प्रवेश करू नये. जायचे असल्यास टोळक्याने जावे. अशा वन विभागामार्फत वन क्षेत्रालगतच्या गावातील मजूरांना सूचना देण्यात आल्या असल्याचे समजते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत