फडमुंशीकडून अतिरिक्त पुडके घेऊन मजुरांचे शोषण वन विभागाने मजुरांची लूट थांबवावी

महाराष्ट्र
Share

फडमुंशीकडून अतिरिक्त पुडके घेऊन मजुरांचे शोषण

वन विभागाने मजुरांची लूट थांबवावी

कालिदास खोब्रागडे, लाखनी :- येथील वन परिक्षेत्रासह जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनास सुरुवात करण्यात आली असून कंत्राटदार नियुक्त फडमुंशी कडून युनिट व्यवस्थापक व चेकर चे संगनमताने १०० पुडक्यांवर ५ पुडके अतिरिक्त घेऊन मजुरांचे शोषण करणे सुरू केले आहे. वन अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे स्वतः लक्ष पुरवून अतिरिक्त पुडके घेऊन होणारे मजुरांचे शोषण थांबविणे आवश्यक झाले आहे.
लाखनी वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत उमरझरी, लाखनी व जांभळी या सहवन क्षेत्रातील रामपुरी, निलागोंदी, उमरझरी, चांदोरी, लाखनी या तेंदूपत्ता युनिट चे वन विभागाकडून गोंदिया येथील कंत्राटदारांना तेंदूपत्ता संकलनाचे कंत्राट देण्यात आले असून स्थानिक वन अधिकारी व. कर्मचाऱ्यांचे सनियंत्रणात तेंदूपत्ता संकलनाला प्रारंभ झाला आहे. युनिट व्यवस्थापन, चेकर व फडमुंशी च्या संगनमताने १०० पुडक्यांवर ५ पुडके अतिरिक्त घेऊन मजुरांचे शोषण केले जात आहे. लाखनी वन परिक्षेत्रालगत कोका वन्यजीव अभयारण्यासह नागझिरा, नवेगाव व्याघ्र प्रकल्प असून यात हिसंत्र श्र्वापदांचे वास्तव्य असून लाखनी वन परिक्षेत्रातून रात्रीचे सुमारास वन्य प्राण्यांचा भ्रमण मार्ग आहे. उन्हाच्या दाहकतेमुळे मजूरही पहाटेपासून वनक्षेत्रात जाऊन तेंदूपत्ता संकलन करीत असते. या वर्षी १०० पुडक्यास २८५ रुपये दरासह बोनसची व्यवस्था आहे. पहाटेचे सुमारास तेंदूपत्ता तोडून आणून दिवसभर इतर दैनंदिन कामे होत असल्यामुळे ग्रामीण परिसरातील मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात तेंदूपत्ता संकलनाकडे आकर्षित झाला आहे. पहाटे पासून सायंकाळ पर्यंत तेंदूपत्ता तोडणी, पुडके बांधणी करून संकलन केंद्रावर नेल्यानंतर १०० पुडक्यांवर फडमुंशी कडून ५ पुडके अतिरिक्त घेतले जात असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका मजुराने सांगितले. वन अधिकाऱ्यासह स्थानिक वन कर्मचाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे स्वतः लक्ष पुरवून मजुरांची होणारी लूट थांबवून फडमुंशींना अतिरिक्त पुडके घेणे बंद करण्याची ताकीद देणे आवश्यक झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत