बांधकाम कामगारांसाठी मंडळाची ऑनलाईन साईट अखेर खुली…
भारतीय मजदुर संघांच्या मागणीला यश.
एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील.
महाराष्ट्र, इमारत व इतर बांधकाम कामगार
कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणी, नूतनीकरण व लाभ अर्ज ऑनलाइन करण्याची साईट खुली करण्यात यावी अशी मागणी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या सोबत झालेल्या मंत्रालय स्तरावरील बैठकीत भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार ४ फेब्रुवारी २०२५ रात्री पासून बांधकाम मंडळाची ऑनलाईन करण्याची साईट खुली करण्यात आली असून मजदूर संघाच्या मागणीला यश मिळाले आहे. आता बांधकाम कामगारांना नोंदणी, नूतनीकरण व लाभ अर्ज बाहेरून ऑनलाईन करता येणार असल्याची माहिती बांधकाम कामगार महासंघ प्रदेशाध्यक्ष हरी चव्हाण यांनी दिली.
महाराष्ट्र भरातील कामगारांच्या समस्यांबाबत शासनाने धोरण निश्चित करुन कामगारांना न्याय देण्यात यावा व बांधकाम कामगारांची ऑनलाईन साईट बंद केल्यामुळे कामगारांना होणारा त्रास व प्रलंबित प्रश्न यासाठी भारतीय मजदूर संघाच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ७ जानेवारी रोजी मंत्रालय मुंबई येथील आपल्या दालनात मजदूर संघाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती. यावेळी भारतीय मजदूर संघ क्षेत्रीय संघटनमंत्री सी. व्ही. राजेश, प्रदेशाध्यक्ष अनिल दुमणे, महामंत्री किरण मिलगीर, संघटनमंत्री बाळासाहेब भुजबळ, बांधकाम कामगार महासंघ प्रदेशाध्यक्ष हरी चव्हाण व विदर्भ प्रांत पदाधिकारी उपस्थित होते.त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांचे प्रलंबित २ लाखापेक्षा जास्त ऑनलाईन लाभ अर्ज मंजूर करुन लाभ रक्कम कामगारांच्या बँक खाती जमा करण्यात येतील असे आश्वासन मंत्री श्री. फुंडकर यांनी दिल्यानुसार प्रलंबित लाभ रक्कमही कामगारांच्या बँक खाती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बांधकाम कामगारांना ठेकेदार एजन्सी मार्फत चालू असलेल्या योजनांचा फेर आढावा घेण्यात येत असून, कामगार कुटुंबीयांच्या कल्याणासाठी त्यात सुधारणा करण्यात येत आहे. बोगस नोंदणी व एजंटांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार केलेली पूर्तता यासाठी भारतीय मजदूर संघाकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

