जगभरातील गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेतील विश्वास वाढत आहे. त्यामुळेच अरबी समुद्राच्या दोन्ही टोकांवरील मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या यूएई आणि भारतातील बँकांमध्ये बँकिंग भागीदारी होत आहे. ही बँकिंग भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारताची जगामध्ये सर्वात जास्त वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. या अर्थव्यवस्थेच्या वेगामध्ये महाराष्ट्राचाही सिंहाचा वाटा आहे. देशातील ४० टक्के परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येत आहे. महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीच्या अपार संधी आहेत. समृद्धी महामार्ग, मुंबईतील पायाभूत सुविधा विकास प्रकल्प, मजबूत दळणवळण सुविधा यामुळे राज्य हे देशाच्या ‘विकास गाथे’मध्ये अग्रणी आहे.
महाराष्ट्रात सुरू झालेल्या आरबीएल बँकेने आपल्या कार्याचा विस्तार जागतिक स्तरावर केला आहे. बँकेची ही प्रगती देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचे द्योतक आहे. त्यामुळेच आजची ही ऐतिहासिक भागीदारी भारताच्या विदेशी गुंतवणुकीचे सर्वात मोठे उदाहरण बनत आहे. हा कार्यक्रम केवळ कागदपत्रे हस्तांतरणाचा नाही, तर इतिहास निर्मितीचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात यूएई आणि भारताचे संबंध अधिकाधिक दृढ होत आहे. ही आजची बँकिंग भागीदारी त्याचेच प्रतीक आहे. देश विदेशातील अनेक नामांकित बँक आज भारतीय बँकिंगसोबत भागीदारी करण्यास तयार आहे. यामुळे निश्चितच भारताची अर्थव्यवस्था अधिक विकसित होण्यासाठी मदत होणार आहे, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
एमिरेट्स एनबीडीचे उपाध्यक्ष हिशाम अब्दुल्ला अल कासिम म्हणाले की, या भागीदारीमुळे आणि भारतामधील व्यापार अधिक वृद्धिंगत होईल. भारतीय उद्योजक यूएईमध्ये येऊन गुंतवणूक करतील. या भागीदारीचा सकारात्मक प्रभाव दोन्ही देशातील बँकिंग व्यवस्थेवर पडणार आहे.
केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग घेतला. आरबीएल बँकेचे संचालक चंदन सिन्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी आर सुब्रमण्यमकुमार, केंद्रीय वित्त विभागाचे सचिव संजय लोहिया, एमिरेट्स एनबीडीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हिशाम अब्दुल्ला अल कासिम, बँक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेने नेल्सन आदी यावेळी उपस्थित होते.

