(जिल्हा प्रतिनिधी पंचशिल वाळके)
खडसंगी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर : ग्रामपंचायत खडसंगी अंतर्गत मनरेगा योजनेतून करण्यात आलेल्या क्रीडांगणाच्या कामात कथित अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची झालेली चौकशी योग्य पद्धतीने झाली नसल्याचा आक्षेप ग्रामपंचायत सदस्य रुपचंद बाबुराव शास्त्रकार यांनी घेतला आहे. त्यांनी याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन प्रकरणाची पुन्हा निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, मनरेगा अंतर्गत २०२३-२४ या कालावधीत क्रीडांगणाचे काम करण्यात आले. या कामासंदर्भात झालेल्या चौकशीत काही महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
निवेदनात तत्कालीन ग्रामसेवकांच्या जबाबाचा उल्लेख करताना क्रीडांगणाचे अंदाजपत्रक ग्रामपंचायतीला प्राप्त झाले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच निविदा प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, निविदा मंजुरीसंबंधीच्या कार्यवाही अहवालावर ग्रामसेवकांची कथित बोगस स्वाक्षरी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
क्रीडांगणाच्या कामाच्या खर्चाबाबतही निवेदनात विविध आकडे नमूद करण्यात आले आहेत. मजुरी, बिगरमजुरी तसेच इतर खर्चाच्या नोंदींमध्ये तफावत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मजुरांच्या पेमेंटची नोंद ऑनलाइन पासबुकमध्ये करण्यात आली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, काम अर्धवट असतानाही पूर्ण कामाचे प्रमाणपत्र (CC) तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच क्रीडांगणाचा निधी ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमताने परस्पर वितरित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मनरेगा पासबुकमधील निधी व खर्चाच्या नोंदींचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला असून, लेबर पेमेंटसह विविध खर्चांच्या बाबतीत चौकशी अहवालात स्पष्टता नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
या सर्व बाबींची योग्य तपासणी न झाल्याने विद्यमान चौकशी अहवाल मान्य नसल्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी स्पष्ट केले आहे. गटविकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ स्तरावरून स्वतंत्र व निष्पक्ष समिती गठीत करून पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या निवेदनातील आरोपांची सत्यता संबंधित अधिकृत कागदपत्रे, मनरेगा नोंदी, मोजमाप पुस्तिका, देयके, प्रशासकीय मंजुरी, कार्यारंभ आदेश व पूर्णत्व प्रमाणपत्र यांच्या तपासणीनंतरच स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे संबंधित प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणार का, याकडे खडसंगी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

