महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘द गव्हर्नन्स चॅलेंज टीजीसी २०२६’च्या चौथ्या पर्वाची राज्य शासनाने घोषणा केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्योग, उद्योजकता, वित्त आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच देशाचे नेतृत्व केले आहे. मात्र, महाराष्ट्राला भारताची नवोन्मेषाची राजधानी आणि जगातील आघाडीच्या नवोन्मेष केंद्रांपैकी एक बनविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी देशातील उत्साही युवा प्रतिभांच्या धाडसी कल्पना, नवे दृष्टिकोन आणि सर्जनशीलतेची गरज आहे. ‘द गव्हर्नन्स चॅलेंज’च्या अंतिम फेरीतील सर्वोत्तम सहा संघ सहभागी होणार आहेत.
भारतातील राज्य शासन व्यवस्थेवर केंद्रित पहिली राष्ट्रीय प्रशासन केंद्रित स्पर्धा म्हणून आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून देशातील प्रतिभावान युवा विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या नवोन्मेषाच्या भविष्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्याची संधी मिळणार आहे. राज्य शासनाच्या पुढाकाराने, गेट्स फाउंडेशनच्या सहकार्याने आणि समग्र संस्थेच्या आयोजनातून ही स्पर्धा होणार आहे. देशातील ३० नामांकित बिझनेस आणि पब्लिक पॉलिसी संस्थांमधील विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी विद्यार्थी महाराष्ट्राच्या दीर्घकालीन महत्वाच्या प्राधान्यक्रमांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राला नवोन्मेषाचे प्रमुख केंद्र बनविण्यासाठी उपाययोजना आणि प्रभावी सूचना सुचविणार आहेत. क्षेत्रनिहाय उपाययोजना विकसित करण्यासाठी सहभागी संघांना आरोग्य, कृषी, नागरी विकास, वित्तीय समावेशन, शासन आणि शिक्षण या सहा प्राधान्य क्षेत्रांपैकी एका क्षेत्राची निवड करावी लागणार आहे.
‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या व्यापक दृष्टिकोनाला पुढे नेत टीजीसी २०२६च्या माध्यमातून देशातील युवा प्रतिभांची सर्जनशीलता, विश्लेषणात्मक क्षमता आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन यांचा उपयोग करून महाराष्ट्राच्या नवोन्मेषाच्या वाटचालीला अधिक वेग देणाऱ्या धाडसी आणि परिणामकारक कल्पना शोधण्यात येणार आहेत.

