मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय श्रीमती सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत “Early Childhood Development – Early 1000 Days” संदर्भात बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या माध्यमातून बालकांच्या, महिलांच्या व किशोरी मुलींच्या पोषणासाठी महिला व बालविकास विभागाकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली.
पोषण ट्रॅकर या ऑनलाइन यंत्रणेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील बालकांच्या पोषणाची इत्यंभूत माहिती विभागाकडे नियमितपणे अद्ययावत होत असते. या माहितीच्या आधारावर विभागाकडून सर्वोत्तम उपाययोजना करण्यात येतात. “पोषण माह” उपक्रमाच्या माध्यमातूनही विभागाकडून राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांचीही या बैठकीत माहिती दिली.
बाळ मातेच्या गर्भात असल्यापासून ते बाळाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंत एकूण १००० दिवसांचा कालावधी कुपोषण प्रतिबंधाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यात सन २०२५-२६ पासून ‘पहिले १००० दिवस’ हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. कुपोषण मुक्तीच्या कार्याला गती देण्यासाठी महिला व बालविकास, आरोग्य, आदिवासी विकास, शालेय शिक्षण आदी विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे.
महाराष्ट्राच्या स्थानिक खाद्यपरंपरा व लाभार्थ्यांची स्वीकारार्हता लक्षात घेऊन पोषण आहाराच्या स्वरूपाचा पुनर्विचार करण्यात येत आहे. पोषण आहारामध्ये आवश्यक पोषक घटक, त्यांचे प्रमाण, आहाराची रेसिपी व सेवनाची वारंवारता याबाबत तज्ज्ञ समिती स्थापन करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. समितीच्या शिफारशींच्या आधारे पोषण आहाराचे नवीन स्वरूप व दर निश्चित करण्याबाबत कार्यवाही करावी अशा संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

