*🔹 भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- पोस्ट नं.१३०.*🔹
*🔹८. विवेकशीलता आणि एकाग्रता.*🔹
◾ प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा. सावधान राहत जा.आस्थायुक्त आणि धैर्यशील राहत जा.
◾ हा बौद्ध जीवनमार्ग होय.
◾ आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचा परिणाम आहे. ते सर्व आपल्या विचारांवर अधिष्ठित आहे आणि आपल्या विचारांचेच बनलेले आहे. जर मनुष्य दुर्विचाराने बोलू लागले,कृती करू लागले तर दुःख त्याचा पाठलाग करीत राहते. शुद्ध विचाराने बोलले आणि चालले तर सौख्य चालून येते. म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्त्व आहे.
◾ अविचारी बनू नका. आपल्या विचारांवर लक्ष असू द्या. कर्दमात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळीक करण्यासाठी झटतो त्याप्रमाणे असत्मार्गापासून आपली मुक्तता करा.
◾ शहाण्या माणसांनी आपल्या चित्ताची राखण करावी. कारण ते कळायला कठीण,अतिशय धुर्त असून, जिकडे वाट मिळेल तिकडे ते सैराटासारखे धावत राहतात. सुरक्षित विचार हे सौख्यदाते आहेत.
◾ नीटपणे शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकारांना प्रवेश लाभत नाही.
◾ ज्याप्रमाणे व्यवस्थित शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही त्याप्रमाणे चिंतनमुक्त मनात विकाराला प्रवेश लाभत नाही.
◾ माझे मन एकेकाळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते. परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने क्षुब्ध गजाला वाळवीत असतो त्याप्रमाणे मी आता आपल्या मनावर स्वामित्व गाजवीत आहे.
◾ दुर्नीवार आणि सैराट अशा मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे.काबुत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे.
◾ दूरवर भटकणाऱ्या मनाला लगाम घालणारे कामबंधनापासून विमुक्त होतात.
◾ जर माणसाची श्रद्धा अचल नसली,तर सदधर्म त्यास अज्ञात असेल आणि जर त्याची मन:शांती बिघडलेली असेल तर त्याची प्रज्ञा दोषरहित असू शकत नाही.
◾ एक द्वेष्टा दुसऱ्या द्वेष्ट्याला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो त्यापेक्षा वाईट मार्गाने वळलेले माणसाचे मन अधिक उपद्रव निर्मिते.
◾आईबाप,आप्तेष्टांपेक्षाही चांगल्या मार्गाकडे वळलेले मन आपले अधिक हित करते.
*🔹( संदर्भ-भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पान नं.२८०.)*🔹
*🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.*🔹

