नागपूरच्या अंबाझरीतील डॉ. आंबेडकर भवनप्रकरणी प्रशासनाला उत्तरासाठी अखेरची संधी
वरोरा सत्र न्यायालयात ११ जानेवारीला सुनावणी
नागपूर : अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बुलडोझरद्वारे उद्ध्वस्त केल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीकरिता विनोद खोब्रागडे यांनी दाखल केलेल्या फौजदारी याचिकेवर वरोरा जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना उत्तर दाखल करण्यासाठी येत्या ११ जानेवारीपर्यंत अखेरचा अवधी दिला आहे.

याप्रकरणी १३ फेब्रुवारी २०२३ रोजी न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावली होती. नोटीस बजाविल्यानंतर उत्तर सादर न केल्यामुळे न्यायालयाने प्रशासकीय अधिकारी प्रतिवादींना उत्तर सादर करण्याकरिता अखेरची संधी दिली. दरम्यान खोब्रागडे यांनी प्रतिवादींना संधी देऊ नये, अशी मागणी केली; परंतु न्यायालयाने प्रतिवादींना उत्तर दाखल करण्यासाठी अखेरची संधी दिली. महसूल अधिकाऱ्यांनी अंबाझरी तलावाला २०२० मध्ये सातबारावर बगिचा म्हणून
दाखविला असल्याचा आरोप खोब्रागडे यांनी केला आहे. अंबाझरी प्रकरणात पर्यटन सचिव मंत्रालय (मुंबई), नागपूर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा सहउपायुक्त, उपजिल्हाधिकारी, तहसीलदारासह गरुडा कंपनीच्या संचालकांविरुद्ध फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मनपाने ५० वर्षांपूर्वी बांधले होते; परंतु महसूल अधिकारी व गरुडा कंपनीने तलावाला बगिचा दाखवून बुलडोझरद्वारे सांस्कृतिक भवन उद्ध्वस्त केले, असा आरोप खोब्रागडे यांनी याचिकेत केला आहे. # timesoforangecity.in

